विक्रांत युद्धनौकेची पुन्हा सागरी चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikrant
विक्रांत युद्धनौकेची पुन्हा सागरी चाचणी

विक्रांत युद्धनौकेची पुन्हा सागरी चाचणी

मुंबई : भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका (warship)विक्रांत (Vikrant)पुन्हा समुद्री चाचण्यांसाठी रवाना झाली आहे. या युद्धनौकेची आतापर्यंतची ही तिसरी समुद्री चाचणी आहे. कोची शिपयार्डमध्ये उभारण्यात येत असलेल्या या युद्धनौकेला नुकतीच राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भेट देऊन पाहणी केली होती. नौकेच्या उभारणीबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले होते. यापूर्वी निवृत्त झालेल्या भारताच्या विक्रांत आणि विराट या युद्धनौका ब्रिटिश नौदलाकडून घेतल्या होत्या; तर सध्या वापरात असलेली आयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका रशियाकडून घेतली आहे. आता ही नवी चाळीस हजार टन स्वदेशी बनावटीची विक्रांत युद्धनौका भारतात उभारली जात आहे.

हेही वाचा: ठेवीची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विक्रांतची पहिली समुद्री चाचणी झाली होती. त्यावेळी तिचे इंजिन, दिशादर्शक यंत्रणा व विमानांचे उड्डाण तसेच अन्य साध्या चाचण्या घेण्यात आल्या. ऑक्टोबरमधील दुसऱ्या चाचणीदरम्यान तिच्यावरून कठीण विमानोड्डाणे झाली, तसेच विमाने उतरविण्यात आली. त्यावेळी ही युद्धनौका दहा दिवस समुद्रात होती. भरसमुद्रात तिची कामगिरी कशी आहे हेदेखील पाहण्यात आले. ही कामगिरी समाधानकारक वाटल्याने आता समुद्राच्या वेगवेगळ्या अवस्थेत आणि वेगवेगळ्या वातावरणात ही युद्धनौका कशी काम करते, हे तपासले जाईल. त्याचप्रमाणे शत्रूच्या युद्धनौका आणि विमाने, क्षेपणास्त्रे आधीच ओळखणाऱ्या सेन्सरची परिणामकारकताही आजमावली जाणार आहे.

हेही वाचा: लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण

७६ टक्के उपकरणे स्वदेशी

विक्रांत युद्धनौकेवरील ७६ टक्के उपकरणे स्वदेशी बनावटीची असल्याने आत्मनिर्भर भारत मोहिमेचा ती उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगितले जाते. भारतात आतापर्यंत उभारण्यात येत असलेली ही सर्वांत मोठी व उभारण्यास कठीण अशा प्रकारची युद्धनौका आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या फैलावातही बांधणीचे काम अखंडपणे सुरू आहे. चाचण्या पूर्ण झाल्यावर तिला नौदल ताफ्यात दाखल करून घेतले जाणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top