नोकरीसाठी हुतात्मा जवानाच्या पत्नीची परवड 

दीपा कदम
रविवार, 6 मे 2018

नवऱ्याचा आधार होता तेव्हा बॉर्डरवर मुलांसह राहण्यास कोणतीच धास्ती नव्हती. आता मात्र नको वाटते. आम्ही कुठलीही आर्थिक मदत मागत नाही. मला सन्मानाने माझ्या मुलांना वाढवता यावे यासाठी नोकरी मागतेय. 
- रूपाली महाबरे 

मुंबई : हुतात्मा प्रमोद महाबरे यांनी काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे कौतुक करून केंद्रीय गृह विभागाने त्यांचा सन्मान प्रशस्तीपत्रक आणि पदक देऊन केला होता. मात्र त्यांच्या पश्‍चात दोन लहान मुलांना केवळ निवृत्तिवेतनावर वाढविणे कठीण जात असल्याने राज्य सरकारच्या सेवेत हवालदार म्हणून नोकरी करण्याची तयारी दाखविणाऱ्या रूपाली महाबरे या गेली दीड वर्षे मंत्रालयातील उंबरठा झिजवत आहेत. पण याबाबत राज्य शासनाचे धोरण ठरलेले नसल्याचे शासकीय थाटातले कोरडे उत्तर त्यांना दीड 
वर्षानंतर दिले गेल्याने रूपाली महाबरे हवालदिल झाल्या आहेत. 

प्रमोद महाबरे हे 2016 सप्टेंबरमध्ये शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला केंद्रीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) नोकरी देण्याची तयारी दाखवली. मात्र मुलगा आणि मुलगी लहान असल्याने महाराष्ट्राच्या बाहेर नोकरी करण्यास जाण्याची त्यांची तयारी नाही. पण राज्यात कुठेही अगदी पोलिस हवालदार म्हणूनही नोकरी करण्याची तयारी रूपाली महाबरे यांनी दाखवली आहे.

त्यासाठी गेली दीड वर्षे त्या सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांपासून मंत्रालयापर्यंत विनंती अर्ज घेऊन त्या फिरत आहेत. मी दर पंधरा दिवसांनी येते, पण माझ्या फाईलचा काहीच थांगपत्ता लागत नाही. फक्‍त याबाबत धोरण ठरलेले नसल्याचे तोंडी मोघम उत्तर दिले जाते, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Martyr Javans wifes search for job