एमबीएचे वादग्रस्त विद्यार्थी रडारवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

गुणपत्रकांची चाचपणी करणार
यानंतर सीईटी सेलने २०१५ ते २०१९ पर्यंत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती प्रवेश नियंत्रण समितीकडे मागविली आहे. ॲटमा संस्थेतून प्रवेश परीक्षा दिलेल्या आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांची तपासणी करण्यात येणार आहे. सीईटी सेलने समितीकडे माहिती मागवली असल्याचे, सेलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु महिनाभरापासून समितीने ही माहिती सेलला उपलब्ध करून दिलेली नाही. समितीकडून माहिती मिळताच कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

मुंबई - व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमास बनावट गुणपत्रक देऊन प्रवेश मिळवलेल्या २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा रद्द करण्यात आले. त्यामुळे आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) खासगी संस्थेतून प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश घेतलेल्या सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांकडे तपासणी करणार आहे.

राज्यात एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश हे कॅट, सीमॅट आणि ॲटमा यासह विविध खासगी संस्थांच्या माध्यमातून प्रवेश परीक्षांच्या आधारे देण्यात येतात. मुंबईतील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी असते. यंदा विद्यार्थ्यांचे पर्सेटाईल वाढवले असल्याची तक्रार प्रवेश नियमन प्राधिकरणाकडे आली होती. प्रकरणाची तपासणी केली असता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्राधिकरणाने खासगी संस्थांच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रकांची पडताळणी सुरू केली. या वेळी सीईटी सेलच्या प्रवेश नियंत्रण समितीने एमबीए किंवा एमएमएस प्रवेश घेताना बनावट गुणपत्रक देणाऱ्या १८७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतून वगळले. त्याचप्रमाणे २५ विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA controversial student on the radar education