आश्‍वासनानंतरही विद्यार्थ्यांचा ठिय्या 

आश्‍वासनानंतरही विद्यार्थ्यांचा ठिय्या 

मुंबई -  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत असे आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा प्रवेश नाकारलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले असून, प्रवेश रद्द न करण्याचे ठोस आश्‍वासन दिल्याशिवाय या विद्यार्थ्यांनी न हटण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, असे आश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले असले, तरी आंदोलक विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरू आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणांतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश काल रद्द केल्यानंतर आज विद्यार्थ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आंदोलक विद्यार्थ्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन विद्यार्थ्यांना दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनाने समाधान न झाल्याने विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या कार्यालयात ठाण मांडले. न्यायालयाच्या आदेशानंतर संचालनालयाकडून प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष असून सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे केली. 

आंदोलक विद्यार्थी शिक्षण संचालकांच्या कार्यालयातून रात्री उशिराही बाहेर पडायला तयार नव्हते. याविषयी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जाऊ नयेत अशीच मागणी आहे. सरकारने आश्‍वासन न देता प्रवेश कायम ठेवण्याची घोषणा करण्याची आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, एका विद्यार्थ्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दूरध्वनी करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com