
तात्या लांडगे
सोलापूर : चुलत वहिनीसोबत पळून जाऊन कायमचेच एकत्र रहायचा निशांत सावत याने प्लॅन केला. त्यासाठी निशांतने यु-ट्यूबवर क्राईम पेट्रोल, सीआयडी मालिकेचे अनेक भाग पाहिले. त्यानंतर त्याने गोपाळपूर परिसरातून एका मनोरूग्ण महिलेला दुचाकीवरून पाटखळ (ता. मंगळवेढा) येथे आणले. १२ जुलैला गळा आवळून तिचा खून केला आणि मृतदेह घराजवळील पडक्या घरात ठेवला. १४ जुलैला घराजवळील कडब्याच्या गंजीत मृतदेह पेटवून दिला आणि प्रेयसी किरणने आत्महत्या केल्याचा बनाव केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.
कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करणाऱ्या निशांतची नजर त्याच्या चुलत वहिनीवर पडली आणि त्याने तिच्याशी ओळख वाढविली. नऊ-दहा महिन्यांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघे अधूनमधून एकमेकांना भेटू लागले. निशांत एक महिन्यापूर्वी गावी आला होता. त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, पण त्यामुळे आपल्या कुटुंबियांची बदनामी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने क्राईम पेट्रोलचे काही एपिसोड पाहिले. किरणच्या वयाची मनोरूग्ण महिला आणून तिला जाळायचे आणि सासरच्या त्रासाला कंटाळून किरणने आत्महत्या केल्याचे भासवायचे.
तत्पूर्वी, किरणला कराड येथे आपल्या खोलीवर नेऊन ठेवायचे, असा निशांतचा प्लॅन होता. दरम्यान, निशांतने आणलेली मनोरूग्ण महिला गोपाळपूर येथील असल्याचा सुगावा पोलिसांना लागला असून पोलिसांनी तिच्या घरी भेट दिली आहे. तेथून तिचे केस घेऊन जळालेला मृतदेह आणि त्या केसांचा ‘डीएन’ तपासून पाहिला जात आहे. पोलिस निरीक्षक बोरीगिड्डे तपास करीत आहेत.
‘तुझा मुलगा आपण शोधू’ म्हणून ‘ती’ला आणले, अन्...
गोपाळपूर येथील त्या महिलेचा मुलगा काही वर्षांपूर्वी हरविला होता. घरी तिच्या पतीसोबत ती रहायची, पण मुलगा हरविल्याने ती त्याच्या शोधात वेडी झाली होती. निशांत आपला प्लॅन यशस्वी करण्यासाठी मनोरूग्ण महिलेच्या शोधात होता. त्याची नजर गोपाळपूरच्या त्या मनोरूग्ण महिलेवर पडली आणि आपण दोघे तुझ्या मुलाला शोधू म्हणून निशांतने तिचा विश्वास संपादन केला. तिला दुचाकीवर बसवून त्याने त्या महिलेला गावी आणले होते. घटनेच्या दोन दिवसापूर्वी निशांतने तिचा रूमालाने गळा आवळून खून केला होता, अशी कबुली त्याने दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.