विदर्भात जोरदार सरींची शक्यता; कोकण, मराठवाड्यातही हलक्या पावसाची शक्यता 

प्रतिनिधी
Monday, 22 June 2020

विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे.तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अदांज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे  : मॉन्सूनच्या पावसाने राज्याच्या बहुतांशी भागात उघडीप दिली आहे. राज्यात ढगाळ आकाश, कोरड्या हवामानासह उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २२) विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अदांज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. यातच उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने पूर्वेकडून वारे वाहणार असल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे आजपासून पूर्व आणि मध्य भारतात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, अरबी समुद्रात ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

रविवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील कल्याण येथे २५ मिलिमीटर, मराठवाड्यातील कळमनुरी येथे २२ मिलिमीटर, मंथा ३४, चाकूर ३२, नांदेड २८, मानवत ४८, सेलू ३६ तर सोनपेठ येथे २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर उर्वरीत राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानसह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. 

पुणेकरांनो, कोरोना हाताबाहेर जातोय; आजचा आकडा ऐकाल तर धक्का बसेल!

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती 
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरेकडील राज्यांमधील वाटचाल काहीशी रेंगाळली आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील वाटचाल सहा दिवसांपासून, तर गुजरातमधील मॉन्सूनची वाटचाल आठवडाभरापासून जैसे थे आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान होत असल्याने उद्यापर्यंत (ता. २३) मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांसह उत्तराखंड राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department has forecast heavy showers in Vidarbha