Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी राहणार; ऑक्टोबर हीटचा तडाखाही कमीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meteorological Department Maharashtra weather updates

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी राहणार; ऑक्टोबर हीटचा तडाखाही कमीच

पुणे : यंदा मॉन्सूनच्या काळात देशात सरासरी ओलांडलेला पाऊस नोव्हेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त असेल. तसेच हिवाळ्याच्या हंगामात देशात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

राज्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी असेल. परिणामी, नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेद्वारे दिली.

‘आयएमडी’द्वारे आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत नोव्हेंबर महिन्यातील कमाल, किमान तापमान आणि पाऊस यांचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीचा कडाका कमी राहू शकतो. राज्यात परतीच्या प्रवासादरम्यान मॉन्सूनने धुवाधार हजेरी लावली होती. मॉन्सून देशाबाहेर पडताच राज्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे.

मात्र, नोव्हेंबरमध्ये राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान हे सरासरी व त्याहून अधिक राहण्याचा अंदाज आहे, तर वायव्य भारत आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याकडील भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानाची स्थिती पाहता देशात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा घट होऊ शकते. पूर्व भारतातील राज्यांसह ईशान्येकडील राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल, असेही हवामानशास्त्र विभागाने नमूद केले.

सरासरीपेक्षा अधिक पाऊस

साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात देशात २९.७ मिलिमीटर इतका पाऊस पडतो. दरम्यान, ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण या कालावधीत जास्त असते. दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये सरासरी ११८.९ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक (१२३ टक्क्यांपेक्षा जास्त) पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत आहेत. देशाच्या अति उत्तर आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उर्वरित देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असे मोहापात्रा यांनी सांगितले.

असेही अंदाज

  • यंदा ऑक्टोबर हिटचा प्रभाव जास्त नाही

  • महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण भागात पावसाची शक्यता

  • किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ, तर कमाल तापमानात घट अपेक्षित