Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

राज्यासह गोवा, उत्तर कर्नाटक आणि गुजरातवर बाष्पयुक्त ढग पाहायला मिळत आहेत. त्यांचा प्रवास उत्तर-पूर्वेकडे होत असल्याचे दिसते.

पुणे : पुढील चोवीस तासात कोकण, गोव्यात बहुतेक ठिकाणी, तर मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी मध्यम आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

शनिवारी (ता.२९) कोकण, गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात निवडक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मागील चोवीस तासात राज्यात महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांनो तयारीत राहा​

राज्यभर बाष्पाचे ढग :
राज्यासह गोवा, उत्तर कर्नाटक आणि गुजरातवर बाष्पयुक्त ढग पाहायला मिळत आहेत. त्यांचा प्रवास उत्तर-पूर्वेकडे होत असल्याचे दिसते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपग्रह नकाशावरून हे स्पष्ट होते. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान मुख्यत: ढगाळ आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

उत्तर किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा :
रविवारी (ता.३०) राज्याच्या उत्तर किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवार नंतर ही शक्यता कमी होणार असून पावसाचाही जोर ओसरत जाईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यापि यांनी वर्तवली आहे.

शनिवारी पडलेला पाऊस (मिलीमीटर):
महाबळेश्वर : ४८
मुंबई : १७
पुणे : ५.८
नाशिक : ३
सातारा : १

Video : पुणे पोलिसांच्या 'प्लाझ्मादान'मुळे वाचताहेत कोरोना रुग्णांचे जीव!​

पुण्यात दिवसभर पावसाची हजेरी
आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही पावसाने शहरात हजेरी लावली होती. शनिवारी दिवसभरात सरासरी ५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच पुढील दोन दिवस आकाश ढगाळ असेल, तर बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहरातील बहुतेक भागात आठवडाभर पावसाची हजेरी कायम पाहायला मिळाली. घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे धरणे ओसंडून वाहायला लागली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता नोंदवलेल्या आकडेवारीनुसार पाषाण येथे सर्वाधिक ७.८ मिलीमीटर, तर लोहगाव येथे ६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department warned of torrential rains in Ghat Area in the next 24 hours