Video : पुणे पोलिसांच्या 'प्लाझ्मादान'मुळे वाचताहेत कोरोना रुग्णांचे जीव!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

कोरोनाबाधीत रुग्णांना प्लाझ्माची गरज लक्षात घेऊन त्यांना नोंदणी करण्यासाठी तसेच प्लाझ्मादात्यांनाही योग्य ठिकाणी प्लाझ्मा देता यावा, यासाठी पुणे पोलिसांनी http://puneplasma.in या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली.

पुणे : स्वाती वानखेडे (नाव बदलले आहे) यांच्या ७० वर्षीय आई कोरोनाबाधीत होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली होती. आई शेवटच्या घटका मोजत असतानाच त्यांनी पुणे पोलिसांच्या प्लाझ्मासंबंधीच्या संकेतस्थळावर प्लाझ्माच्या आवश्‍यकतेसाठी नोंदणी केली. दुसऱ्याच दिवशी त्यांना प्लाझ्मादाता उपलब्ध असल्याचा पोलिसांचा फोन गेला. वानखेडे यांच्या आईला प्लाझ्मा उपलब्ध झाला आणि त्याने त्यांचा जीव वाचला! हे घडलंय ते पुणे पोलिसांनी प्लाझ्मादात्यांना केलेल्या आवाहनामुळे!

'तो' व्हिडीओ पुण्यातला नाहीच; व्हॉट्सअप बहाद्दरांकडून पुन्हा 'होऊ दे व्हायरल'!​ 

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्‍टरांइतकेच प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. त्यामुळेच डॉक्‍टरांपाठोपाठ पोलिसांनाही कोरोनाचा सामना करावा लागला. त्यामध्ये १३ हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाने ग्रासले, तर शंभरहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. असे असतानाही पोलिसांकडून कोरोनाविरुद्धची लढाई थांबली नाही. कोरोना रोखण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या पोलिस प्रशासनाने आता प्लाझ्मादानासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि त्यांच्या टिमकडून प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मादाते उपलब्ध करुन देण्याची संकल्पना पुढे आणली. 

दरम्यान, पोलिस आयुक्‍तालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते प्लाझ्मादान करणाऱ्या करण रणदिवे, मोहित नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत,राहुल लंगर, जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी आणि मोहित तोडी यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्र, संभाजी कदम, मितेश घट्टे उपस्थित होते. 

बिल्डर आणि ग्राहकांमधील वाद मिटवण्यासाठी 'महारेरा'चा पुढाकार; 'अशी' केली जात आहे मदत!​

...अशी केली आहे प्लाझ्मासंबंधीची व्यवस्था 
कोरोनाबाधीत रुग्णांना प्लाझ्माची गरज लक्षात घेऊन त्यांना नोंदणी करण्यासाठी तसेच प्लाझ्मादात्यांनाही योग्य ठिकाणी प्लाझ्मा देता यावा, यासाठी पुणे पोलिसांनी http://puneplasma.in या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली. १५ ऑगस्टपासून गरजू आणि प्लाझ्मादात्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्ती या वेबसाईटवर नोंदणी करून प्लाझ्मा दान करु शकतात, तर ज्यांना प्लाझ्माची आवश्‍यकता आहे, ते देखील या वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. 

इथे करा नोंदणी 
वेबसाईट : http://puneplasma.in 
व्हॉटस्‌अप : 9960530329 
 
* पहिल्या दिवशीचे प्लाझ्मादाते - ४ 
* सध्या प्लाझ्मादात्यांची संख्या - १० ते २० 
* आत्तापर्यंत उपलब्ध झालेले प्लाझ्मादाते - ४०५ 
* प्लाझ्मासाठी दररोज होणारी मागणी - दररोज १३ ते १४ जण 

पुण्यात 'हे' ९ अधिकारी भेदणार कोरोनाचे चक्र​

''पुण्यासह ग्रामीण भागात कोरोनाबाधीतांची संख्या वाढली आहे. त्यावर मात करण्यासाठी कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तींनी मोठ्या संख्येने पुढे येऊन प्लाझ्मादान करावे. तसे घडले तरच आपण लोकांचे जीव वाचूव शकतो. पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी प्लाझ्मासंबंधी माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ तयार केले आहे. त्यास कोरोनामुक्त नागरीकांनी चांगला प्रतिसाद द्यावा.''
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त 

''प्लाझ्मादात्यांनी शंका-कुशंकांवर मात करीत प्लाझ्मादानाची केलेल्या कृतीमुळे एखाद्याचा जीव वाचण्यास मदत झाली. प्लाझ्मादानाची ही एक मोठी चळवळ निर्माण होऊन ती शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही राबवावी. त्यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्या नागरीकांनी पुढाकार घ्यावा.''
- डॉ. रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त. 

''प्लाझ्मा हे तुमच्या शरीरातील कोरोनाला हरविणारे सैनिक आहेत. या सैनिकांनी तुमच्यासाठी काम केले आहे. आता त्यांना दुसऱ्यांच्या शरीरातील कोरोनाविरुद्ध लढविण्यास पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे नागरीकांचे प्राण वाचतील. मी स्वतः प्लाझ्मादान केले आहे, तुमच्यासारख्या कोरोनामुक्त नागरीकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे.''
- कार्तिक नाईक, प्लाझ्मादाते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police plasma donation initiative saves lives of Corona patients