कार्तिकी यात्रेसाठी एक लाख भाविक दाखल 

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पंढरपूर - कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. आज सायंकाळी पंढरीत सुमारे एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून चंद्रभागेत पाणी सोडावे, अशी मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे. 

कार्तिकी यात्रेचा सोहळा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या भागातून वारकरी एसटी, रेल्वेसह खासगी वाहनाने शहरात दाखल होऊ लागले आहेत. शहरातील मठ व धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीने भरले आहेत. यात्रेच्या निमित्ताने वाळवंटामध्ये राहुट्या टाकण्यासाठी वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. नगरपालिकेने वाळवंटात पिण्याचे पाणी, वीज आणि शौचालयांची सोय केली आहे. सध्या पात्रात पाणी नसल्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांची स्नानाची गैरसोय होत आहे. शिवाय पात्रात अजूनही वाळूचे खड्डे आहेत. या खड्यांमुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. 

या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने यात्रेची जय्यत तयारी केली आहे. सर्वत्र विठुनामाचा गजर सुरू झाल्याने पंढरीचे वातावरण भक्तिमय झाले आहे. 

दर्शनरांगेत 30 ते 40 हजार भाविक 

दरम्यान, आज मंगळवारी सायंकाळी पदस्पर्श दर्शनरांग सारडा भवनाच्या पुढे गेली होती. सकाळपर्यंत दर्शनरांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडमध्ये जाईल, असा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला जात आहे. सध्या पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांची गर्दी वाढू लागली असून सुमारे 30 ते 40 हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. 

ऑनलाइन दर्शन बंद 

मुखदर्शनासाठीही भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने आजपासून ते 14 नोव्हेंबरपर्यंत श्री विठ्ठलाचे ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: million pilgrims in pandharpur