एमआयएम बांधणार "मराठी भाषा भवन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

हा "एमआयएम'चा 40 कलमी कार्यक्रम आहे. याला जाहीरनामा म्हणता येणार नाही. सत्ता मिळाली तर या सोईसुविधा मुंबईकरांना देण्याचा पक्षाचा मानस आहे. राज्य सरकराकडे या समस्यांसाठी आमदार म्हणून पाठपुरावा करणार. 
- वारीस पठाण, आमदार, एमआयएम 

मुंबई - निवडणुका जवळ आल्या की सारेच पक्ष मतदारांना भुलविण्यासाठी मोठमोठी आश्‍वासने देतात. ही आश्‍वासने ऐकून अनेकदा सामान्य जनतेला आश्‍चर्याचा धक्का बसतो. असाच धक्का "मजलिस-ए-इत्तेहादुल- मुसलमीन' (एमआयएम) या पक्षाने मुंबईकरांना दिला आहे. तेढ निर्माण करणारी भाषणे करून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या "एमआयएम'ला आता मुंबईतील मराठी भाषेच्या संवर्धनासाठी "मराठी भाषा भवन' बांधण्याचा ध्यास लागला आहे. आपल्या जाहीरनाम्यात तसे आश्‍वासनच त्यांनी मुंबईकरांना दिले आहे. 

गरिबांना मोफत पाणी-वीज, पाच रुपयांत जेवण याचबरोबर मुंबईसाठी "स्वतंत्र विकास नियोजन यंत्रणा' स्थापन करण्याचा उल्लेख या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत एका खासगी कार्यक्रमात हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढविणाऱ्या "एमआयएम'ने मुंबईत एकूण 52 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते मुंबईच्या जाहीरनाम्याचे नुकतेच प्रकाशन झाले. या जाहीरनाम्यात "उर्दू भाषा भवना'सह "मराठी भाषा भवना'ची स्थापना करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. तसेच या दोन्ही भाषांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचा उल्लेखही जाहीरनाम्यात आहे. यासोबत छोट्या व्यापाऱ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मुंबईत "रात्र बाजार' सुरू करण्याचा "एमआयएम'चा मानस आहे. 

मुंबईतील पुरातन वास्तूंचे वैभव जपण्यासाठी आणि सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र "शहर प्राधिकरण' स्थापण्याचा शब्दही या जाहीरनाम्यात देण्यात आला आहे. गरिबांना मोफत पाणी, वीज तसेच मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये "मिनरल वॉटर' देण्याचाही विचार यात पक्षाने मांडला आहे. मनुष्यबळ विकासासाठी पालिका शाळांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा पक्षाचा मानस आहे. पालिकेच्या एकूण अर्थसंकल्पातील 20 टक्के निधी शिक्षण आणि रोजगारावर खर्च करण्यात येणार आहे. दलित आणि मुस्लिमांना परवडणारी घरे, शहरासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी "समन्वय समिती' अशा एकूण 40 मुद्‌द्‌यांच्या या जाहीरनाम्यात हैदराबादमधील अनेक योजनांचा संदर्भ वारंवार देण्यात आला आहे. 

हा "एमआयएम'चा 40 कलमी कार्यक्रम आहे. याला जाहीरनामा म्हणता येणार नाही. सत्ता मिळाली तर या सोईसुविधा मुंबईकरांना देण्याचा पक्षाचा मानस आहे. राज्य सरकराकडे या समस्यांसाठी आमदार म्हणून पाठपुरावा करणार. 
- वारीस पठाण, आमदार, एमआयएम 

Web Title: MIM build Marathi Bhasha Bhavan