मोजक्याच जागांवर ‘लक्ष्य’चा एमआयएमचा फॉर्म्युला यशस्वी, तेलंगणानंतर बिहारमध्ये सर्वांत मोठे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MIM

तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे.

मोजक्याच जागांवर ‘लक्ष्य’चा एमआयएमचा फॉर्म्युला यशस्वी, तेलंगणानंतर बिहारमध्ये सर्वांत मोठे यश

औरंगाबाद : तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे. अनेकांचे अंदाज चुकवत त्यांनी पाच जागा जिंकल्याने महाआघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएने मोजक्या २० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण ५ लाख २३ हजार २७९ मते म्हणजेच १.२४ टक्के मते मिळाली. एमआयएमला हैदराबादनंतर बिहारमध्ये यश मिळाले आहे. आता तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार अशा तीन राज्यांत एमआयएमचे आमदार आहेत. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम समाज एमआयएमकडे वळत असल्याने काँग्रेसच्या चिंतेत भर पडत असून त्यांच्या पारंपरिक व्होट बँकेला तडे जात आहेत.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू


जुन्या हैदराबादेत प्रभाव असलेल्या एमआयएमचे तेलंगणा विधानसभेत सात तर विधानपरिषदेत दोन आमदार आहेत. यानंतर त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य आणि भायखळा अशा दोन ठिकाणी विजय मिळविला होता. २०१४ पासून एमआयएमने दलित-मुस्लिमबहुल मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून उमेदवार दिले होते. तोच फॉर्म्युला २०१९ च्या निवडणुकीत वापरला. २०१९ मध्ये मालेगाव मध्यमधून मौलाना मुफ्ती इस्माईल तर धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह असे दोन आमदार विजयी झाले. यानंतर बिहारच्या सीमांचल या मुस्लिमबहुल भागावर लक्ष केंद्रित केले होते. २०१८ मध्ये किशनगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एमआयएमचे कमरूल हुदा यांनी विजय मिळवत पक्षाची एंट्री करून दिली होती; मात्र २०२० च्या निवडणुकीत त्यांना ही जागा राखता आली नाही. इतर पाच जागांवर मात्र त्यांनी विजय मिळविला.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : मराठा समाजातील विद्यार्थी संभ्रमात, कोणत्या संवर्गातून अर्ज करावा?

मुख्य लढत भाजप-जनता दल संयुक्त सोबत
एमआयएमची मुख्य लढत भाजप आणि संयुक्त जनता दलासोबत झाली. येथे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेले. बहादूरगंज मतदारसंघात एमआयएमच्या अंजर नईमी यांना ८५ हजार ८५५ मते मिळाली. येथे विकासशील इन्सान पार्टी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अमौर विधानसभा मतदारसंघात अख्तुरुल इमान विजय झाले त्यांना ९४ हजार ४५९ मते मिळाली. संयुक्त जनता दलाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. जोकीहाटमध्ये शहनवाज आलम यांना ५९ हजार ५२३ मते मिळाली. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. कोचाधामन येथून इजहार अस्फी विजयी झाले. त्यांना ७९ हजार ८९३ मते मिळाली. त्यांनी जनता दल संयुक्त उमेदवाराचा पराभव केला तर बायसी मतदारसंघातून रुकनुद्दीन अहमद यांनी विजय मिळविला. त्यांना ६८ हजार ४१६ मते मिळाली. येथे भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

काँग्रेसची वाढती चिंता
मोजक्याच जागांवर लक्ष केंद्रित करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम, दलित मते वळविण्यात एमआयएम, वंचित बहुजन आघाडीला यश आले होते. त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला. आता बिहारमध्ये सुद्धा मुस्लिम मते एमआयएमकडे जात असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Web Title: Mims Formula Successful Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top