महाराष्ट्र गारठला; राज्यातील 'या' शहरात तापमान @2.4वर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

 • हंगामातील नीचांकी तापमान; राज्यभरात गारठा वाढला

पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून, आज नाशिकमधील निफाड येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी 2. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, जळगाव, धुळे आणि मराठवाड्यातील उस्मानाबादही चांगलेच गारठले आहे. उद्याही (ता. 18) मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किमान तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली येऊन, सरासरीच्या तुलनेत तापमानात 4.5 अंशांची घट झाली असेल, तर त्या भागात थंडीची लाट आल्याचे समजले जाते. आज निफाड येथे हंगामातील नीचांकी 2.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यापूर्वी 27 डिसेंबर 2018 ला येथे 1.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. पुणे, नगर, मालेगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद येथे तापमान 10 अंशांच्या खाली आले असून, विदर्भात मात्र तापमानाचा पारा 11 अंशांच्या पुढे होता. जळगाव, उस्मानाबाद येथे किमान तापमानात सरासरीपेक्षा 5 अंशांची घट झाल्याने थंडीची लाट होती.

प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअस)

 • पुणे 8.2
 • नगर 9.2
 • धुळे 6.6
 • कोल्हापूर 14.5
 • महाबळेश्वर 10.0
 • मालेगाव 8.2
 • नाशिक 6.0
 • औरंगाबाद 8.1
 • अकोला 12.4
 • नागपूर 15.1

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minimum 2.4 Lowest Temperature In The Season At Niphad