
राज ठाकरेंचा भोंगा, झाला त्याचा ठेंगा : गुलाबराव पाटील
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वेळोवेळी अनेक भूमिका बदलल्या आहेत. आता त्यांनी भोंगा आणला. मात्र त्याचाही ठेंगा झाला आहे, अशी टिका शिवसेनेचे (Shivsena) नेते व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
भूमिका बदलणे त्यांना अवघड नाही - पाटील
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी घेतलेल्या भूमिकेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, गुलाबराव पाटील म्हणाले, की या माणसाने तीन वेळा आपली भूमिका बदलली आहे. आता त्यांची चौथी भूमिका बदलणे त्यांना अवघड नाही. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्व समाजाला सोबत घेण्याची भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या वेळी त्यांनी झेंडाही चार रंगाचा ठेवला होता. पक्ष स्थापन करण्याअगोदर मराठीची भूमिका घेत उत्तर प्रदेशच्या लोकांच्या कानफटात मारली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रशंसा केली. त्यानंतर मोंदींविरोधी भूमिका घेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांच्यावर टिका केली. त्यानंतर पुन्हा आपली भूमिका बदलत झेंड्याचा रंगही बदलला आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आणि आता त्यांनी ‘भोंगा’ काढला आहे. मात्र आता त्यांचा ‘ठेंगा’ झाला आहे.
हेही वाचा: जळगाव : कृषी विभागातील जागा भरा,अन्यथा मंत्रालय हलवून टाकेन
ओबीसी आरक्षणावर विचार सुरू
ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की न्यायालयाने निवडणुकीच्या तयारीसाठी पंधरा दिवसांचा दिलेला कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे याबाबत तज्ज्ञ मंडळी अभ्यास करीत असून, त्याबाबत काय पर्याय आहे? याचा विचार करीत आहे. ओबीसींना न्याय मिळावा, ही राज्यातील सर्वच पक्षांची मागणी आहे. ते जर झाले तर डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व घटकांना न्याय देऊन आरक्षण दिले आहे. त्यामुळे सर्व घटकांना न्याय मिळणार आहे. मात्र न्यायालयाचा सकारात्मक निर्णय आलाच नाही तर आहे त्या परिस्थितीत निवडणूक लढण्याची तयारी सर्वच पक्षाला करावी लागते.
हेही वाचा: जळगाव : कजगाव रस्त्याचे काम 'निकृष्ट'
Web Title: Minister Gulabrao Patil Criticized Raj Thackeray On The Issue Of Bhonga Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..