शुल्कवाढीबद्दल प्रतिज्ञापत्र घेण्याची मंत्र्यांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मुंबई : शिक्षण संस्थांना स्वयंअर्थसाहाय्यतेचा दर्जा देतानाच त्यांच्याकडून थेट शुल्कवाढ होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

मुंबई : शिक्षण संस्थांना स्वयंअर्थसाहाय्यतेचा दर्जा देतानाच त्यांच्याकडून थेट शुल्कवाढ होणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. 

राज्यातील अनेक अभियांत्रिकी संस्थांना स्वयंअर्थसाहाय्य अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. ही महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून भरमसाट शुल्क वसूल करीत असल्याच्या अनेक तक्रारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल वायकर यांनी राज्यपाल के. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिले आहे. 

अभ्यासक्रमाच्या शुल्कात संस्थांना थेट वाढ करता येणार नाही, अशा स्वरूपाचे नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र संस्थांकडून घ्यावे. जेणेकरून संबंधित महाविद्यालयांवर चाप राहील, असे वायकर यांचे म्हणणे आहे. संस्थांचे प्रवेशशुल्क निर्धारण समितीद्वारे अथवा सरकारने ठरवावे. यामुळे शुल्कवाढीवर नियंत्रण राहील. अशा विद्यापीठांना खासगी विनाअनुदानित व्यवसाय शिक्षण शुल्क विनियमातील तरतुदीच्या आधारावर स्वतंत्र नियम, विनिमय जारी करावेत, असे या पत्रात नमूद केले आहे. 

वायकर यांच्या सूचना 
- दर्जावाढीसाठी संस्थांची चौकशी करावी. 
- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीसाठी शिखर परिषद, यूजीसीचे निकष बंधनकारक करावे. 
- दोषी संस्थेची मान्यता स्थगित किंवा रद्द करावी. 

Web Title: Minister's demand for an affidavit for the increase in the fee