मिरजेतील विरोधकांना ‘घड्याळा’ची किल्ली; खाडेंचा अश्‍वमेध रोखणार कोण?

jayant patil
jayant patilsakal
Updated on: 

मिरज : मिरज विधानसभा मतदार संघाचा पट आता अधिक रंगतदार व्हायला सुरवात झाली आहे. भाजप नेत्यांनी पालापाचोळा अशी ज्यांची अवहेलना केली, त्या विरोधकांच्या शिडात आता जयंत पाटील नावाचं वारं घुसलं आहे. मिरज विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचा असेल, असा विश्‍वास जयंतरावांनी व्यक्त केला आहे. निवांत असलेल्या भाजप नेत्यांसाठी ही चिंतेची बातमी आहे. या मतदार संघाची रचना, इथले राजकारण सरळमार्गी नाही. त्यामुळेच जयंतरावांनी (Jayant Patil)वाट वाकडी केली आहे.

मिरज शहर आणि पूर्व भागातील गावांचा हा मोठा मतदार संघ आहे. म्हैसाळ उपसा सिंचना योजना, शहरातील विकासाचे त्रांगडे, येथील जातीनिहाय समीकरणे, पक्ष बाजूला ठेवून सोयीस्कर भूमिका घेण्याची राजकीय पद्धत यामुळे इथे ‘दिसते तसे नसते’, असे नेहमीच झाले आहे. सलग तीन विजयांनंतर भाजपला इथले राजकारण आपण म्हणू तसेच चालेल, असा आत्मविश्‍वास आहे. मदनभाऊंच्या पश्‍चात काँग्रेसचा गट सैरभैर आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी हातातून बाण सुटायला लागल्यानंतर घडी सावरण्याची धडपड सुरू केली आहे.

शिवसेनेचा येथे ‘वोट बेस’ होता, भाजपने तो ढवळून टाकला आहे. मिरज शहरात राष्ट्रवादीची मोट बांधण्याचे प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत. त्याला महापालिकेतील राजकारणात काहीअंशी यशही आले आहे. मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी रुजली नाही. ती रुजवण्याची जबाबदारी घेऊन मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी गावोगावचे प्रमुख गट पक्षात खेचायला सुरवात केली आहे. त्यातून राष्ट्रवादीला आत्मविश्‍वास यायला लागला आहे.

राजकारणाचा मिरज पॅटर्न अलीकडे बदनाम झाला आहे, मात्र याआधी मिरजेने वेचून माणसे निवडली आहेत. समाजसेवक, डॉ. न. रा. पाठक, शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी मोहनराव शिंदे, हाडाचे शिक्षक प्रा. शरद पाटील आणि बेकरीवाले सामान्य कार्यकर्ते हाफिज धत्तुरे असे आमदार निवडले आहेत. याच मिरजेने तासगाव तालुक्यातील पेडमधून जतमार्गे आलेल्या सुरेश खाडे यांनाही तीनवेळा डोक्यावर घेतले आहे. श्री. खाडे यांच्या विजयाची समीकरणे वेगळी होती, मात्र त्यांनी पंधरा वर्षांत भाजप रुजवला आहे. शिवसेनेची जागा भाजपने घेतली आहे. श्री. खाडे हे सर्वपक्षिय दलदलीचा फायदा घेत येथे ‘कमळ’ फुलवत आले आहेत. विरोधकांना चेहरा आणि नेतृत्वच गवसत नव्हते. ते देण्याचा प्रयत्न आता जयंत पाटील यांनी सुरू केला आहे.

मिरजेची जागा आघाडी काँग्रेसकडे असायची. ती गेल्या विधानसभा निवडणुकीत पद्धतशीरपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या गळ्यात घातली गेली. आता पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तरी काँग्रेस ‘ही आमची जागा आहे’, असा दावा करू शकणार नाही. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी पटकावू शकते. बाळासाहेब होनमोरे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने तीनवेळा पराभवानंतरही नेटाने लढाई केली आणि गेल्या निवडणुकीत स्वाभिमानीकडून लढून ६५ हजारांवर मते घेतली. हे राष्ट्रवादीला बळ देणारेच आहे.

jayant patil
सांगलीत निवड स्वीकृत नगरसेवकाची; हस्तक्षेप थेट नाना पटोलेंचा

मिरज शहरातील ‘गठ्ठा’ मतांची बेरीज खूप महत्त्वाची ठरते. ती गणिते मांडणारी यंत्रणा राष्ट्रवादीकडे आहे. मिरज पूर्व भागाचे गणित हळूहळू जुळायला लागले आहे. बूथ पातळीपर्यंत त्यांनी मांडणी सुरू केली आहे. एकेकाळी मदन पाटील आणि अजितराव घोरपडे या नेत्यांना मानणारे गट येथे आहेत. त्यातील अनेक महत्त्वाचे लोक राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे. सर्वपक्षिय रसद हीच भाजपची ताकद आहे. ‘रसद पॅटर्न’ला त्याच ताकदीने उत्तर देण्यात राष्ट्रवादी कमी नाही. त्यामुळे भाजपच्या यशाच्या मुळावरच घाव घालण्याची राष्ट्रवादीची तयारी दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com