परिचारिकांना कारकुनी कामांतून मुक्त करा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मिरज - सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांना कारकुनी कामांतून मुक्त करा, असा आदेश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने दिला आहे. आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. यामुळे राज्यभरातील सरकारी रुग्णालयांत रुग्णसेवा सोडून वरिष्ठांच्या हाताखाली कारकुनी करणाऱ्या परिचारिकांना आता रुग्णांची सेवासुश्रुषा करण्यासाठी वॉर्डात जावे लागेल. 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. टी. पी. लहाने यांनी आदेश जारी केले आहेत. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील अनेक विभागांत परिचारिकांना वेगवेगळी कामे देण्यात आली आहेत. औषध वाटप करणे, केसपेपर काढणे, रुग्णांचे कपडे धुण्याच्या विभागावर लक्ष ठेवणे, अधिसेविका कार्यालय, अधिष्ठाता कार्यालय येथे कारकुनी करणे अशी कामे त्या करत आहेत. काही ठिकाणी पुरुष परिचारक चक्क शिपायाची कामे करताना आढळले आहेत. त्यांना याच्या मोबदल्यात दररोजच्या रुग्णसेवेच्या कामातून सवलत मिळते. वॉर्डात रात्रपाळी करावी लागत नाही. कार्यालयात वरिष्ठ नसतात तेव्हा घरची कामेही करता येतात. 

याबाबत आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. विशेषतः अधिष्ठाता व अधिसेविका कार्यालयात परिचारिकांना कारकुनी कामे लावण्याविरोधात परिचारिका संघटनांनी आवाज उठवला होता. दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला. कारकुनी कामे करणाऱ्या परिचारिकांना मुक्त करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. त्याची अंमलबजावणी न झाल्याने काही दिवसांपूर्वी सहसंचालकांनी पुन्हा आदेश जारी केले आहेत. 

कारकून नसल्यानेच कामे 
अनेक सरकारी रुग्णालयांत कारकुनी दर्जाची पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही मनुष्यबळ मिळत नाही; त्यामुळे नाईलाजास्तव परिचारिकांना ही कामे द्यावी लागतात, असे सरकारी रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले. या स्थितीत रुग्णसेवा दुर्लक्षित होत आहे. पुरेशा संख्येने परिचारिका उपलब्ध न झाल्याने वॉर्डातील कामकाजावर ताण पडत आहे. 

Web Title: miraj news nurse