
MLAs' disqualification: सतत कायद्याची भाषा बोलणाऱ्या नार्वेकरांनी सरन्यायाधीशांची टिप्पणी बघावी; दानवेंचा टोला
मुंबई - शिवसेनेतील बंडानंतरच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवर निर्णय घेण्यास विधानसभेच्या अध्यक्षांनी केलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (18 सप्टेंबर) नाराजी व्यक्त केली आहे. अपात्रतेबाबत अजुन काहीच झालं नाही? असा सवाल करत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले. यावर आता विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर न्यायिक भूमिकेत आहे. मात्र ते न्यायिक भूमिका विसरले. मे महिन्यात न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली. मात्र सप्टेंबर महिना संपत आला असून पहिली सुनावणी झाली. न्याय उशीरा मिळणे म्हणजे, अन्याय असतो. विधानसभा अध्यक्ष वकील आहेत. त्यांना सर्व ज्ञान आहे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून असं करणं लोकशाहीसाठी घातक आहे.
विधानसभा अध्यक्षांना निर्णय तर घ्यावाच लागेल. ते काय निर्णय घेतात, याची आम्हाला काळजी नाही. अध्यक्ष कुठ तरी घाबरतात, ते दबावात आहेत, असं मला वाटतं. सतत कायद्याची भाषा बोलणाऱ्या विधानसभा अध्यक्षांनी माननीय सरन्यायाधीशांची टिप्पणी बघावी. आतातरी आपण लवकरात लवकर निर्णय घ्याल ही अपेक्षा बाळगतो, असंही दानवे यांनी म्हटलं.