
Raj Thackeray: सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला..., राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुण्यातील भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक संघटनांकडून केली जात आहे. यासाठी अनेक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावाही केला आहे.
मात्र अजूनही हे स्मारक फक्त कागदावरच आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं अवचित्त साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहित भिडे वाड्याचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावं अशी विनंती त्यांनी केली आहे.
हेही वाचा: शिवसेना-वंचितचं ठरलं! मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार, पण...
त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, "महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातल्या भिडेवाड्यात रोवली, त्या वास्तूचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा सरकारने ह्या अधिवेशनात केली, त्याचं स्वागतच.
पण अशा घोषणा पुष्कळदा होतात, पण कृती शून्य होते हा पूर्वानुभव आहे. म्हणून माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, अजून एक रखडलेलं स्मारक अशी ह्याची अवस्था होणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि सावित्रीबाईंच्या पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल हे पहा."
हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट
तर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की "पुण्यातील ज्या भिडेवाड्यात पहिली महिलांसाठीची शाळा सुरु झाली तेथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणीसाठी नुकतीच आम्ही बैठक घेतली.
या बैठकीत स्मारक उभारणीबाबत आठवडाभरात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. भिडे वाडा येथे मोठे स्मारक व्हावे ही भूमिका शासनाने घेतली असून लवकरच भूमिपूजन करायचे आहे. हे स्मारकही आधुनिक भारतातील प्रेरणास्थळ ठरणार आहे."