हिऱ्यांच्या आयातीत मनिलाँडरिंगचे रॅकेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

गेल्या काही वर्षांत अशा पद्धतीने सुमारे एक हजार ३०० कोटींचे मनिलाँडरिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मुंबई - एक कोटीचे हिरे तब्बल १५६ कोटी रुपये किमतीचे दाखवून ते आयात केल्याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) रविवारी एका महिलेस अटक केली. कमी प्रतीच्या हिऱ्यांची किंमत शंभरपटीने अधिक दाखवून हाँगकाँगमधून त्यांची आयात केली जात होती. या माध्यमातून मनिलाँडरिंग केले जात असल्याचा संशय गुप्तवार्ता संचालनालयास आला होता. या आर्थिक अफरातफरीमध्ये मुंबई आणि सुरतमधील काही गट काम करत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत अशा पद्धतीने सुमारे एक हजार ३०० कोटींचे मनिलाँडरिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मध्यंतरी बॉम्बे डायमंड बोर्से (बीडीबी) येथे आलेल्या आयातीत मालामध्ये हिऱ्यांसमवेत चौदा घटकांचा समावेश होता, याची माहिती ‘डीआरआय’ला २०१९ मध्ये मिळाली होती. त्यानुसार हाँगकाँग येथून आलेला हा माल ताब्यात घेण्यात आला असता, मुंबई व सुरतमधील काही व्यापाऱ्यांनी शंभर टक्के चढ्या भावाने हिऱ्यांची किंमत दाखवून ते आयात केल्याचे निष्पन्न झाले. त्यात ‘बीडीबी’मधील काही मूल्य निर्धारकांनाही हाताशी धरण्यात आले होते. त्यात १५६ कोटी रुपयांच्या हिऱ्यांची आयात करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांची किंमत एक कोटी तीन लाख रुपये होती. अँटिक एक्‍झिम लि. व तनमन ज्वेल प्रा.लि. यांच्यामार्फत या दागिन्यांची तस्करी करण्यात आली होती. 

महिलेवर कारवाई
या चौदा घटकांसाठीच्या किम्बर्ली प्रोसेस सर्टिफिकेटवर (निर्यात कागदपत्रे) हेतल विजय अवस्थी या महिलेने स्वाक्षरी केली होती. अवस्थीला याप्रकरणी चौकशीसाठी रविवारी डीआरआय कार्यालयात बोलवण्यात आले होते; पण तिने आम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्‍नांची समर्पक उत्तरे न दिल्यामुळे अखेर तिला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अवस्थी ही मालवीय इम्पेक्‍स या कंपनीची मालक आहे. या प्रकरणातील तिच्या सहभागाबाबत पडताळणी सुरू आहे.

काळा पैसा पांढरा
या चढ्या भावातील आयातीमागे आयातदारांच्या फायद्याबाबतची माहिती काढण्यासाठी ‘डीआरआय’ने याप्रकरणी अधिक तपास केला असता, त्या माध्यमातून मनिलाँडरिंग केले जात असल्याचा संशय आहे. त्यासाठी आयातदारांना चार टक्के कमिशन मिळते. या कमी किमतीच्या हिऱ्यांची आयात केल्यानंतर त्यांच्यावर पैलू पाडण्याचे काम सुरतमध्ये होते. त्यानंतर त्यांची निर्यात केली जाते. पण, प्रत्यक्षात देशातील काळा पैसाच या निर्यात केलेल्या हिऱ्यांच्या विक्रीद्वारे परदेशातून भारतात पांढरा होऊन येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moneylaundering racket in diamond imports