मॉन्सून अंदमानात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

पुणे - बहुप्रतीक्षित असलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान-निकोबारमध्ये रविवारी दाखल झाले. या मोसमी वाऱ्यांनी आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार द्वीपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत हजेरी लावली आहे. 

पुणे - बहुप्रतीक्षित असलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमान-निकोबारमध्ये रविवारी दाखल झाले. या मोसमी वाऱ्यांनी आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार द्वीपसमूह, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत हजेरी लावली आहे. 

दरवर्षी अंदमानात 20 मे रोजी दाखल होणारा मॉन्सून गेल्या वर्षी 18 मे या दिवशी दाखल झाला होता, तर या वर्षी सर्वसाधारण तारखेच्या सात दिवस अगोदरच मॉन्सूनचे अंदमानात आगमन झाले आहे. मॉन्सून अशाच प्रकारे पुढे सरकत राहिल्यास यंदा 25 मे किंवा 26 मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होईल, तर कोकणच्या दक्षिण भागात साधारणपणे पाच जूनच्या दरम्यान दाखल होणारा मॉन्सून यंदा एक ते तीन जूनदरम्यानच तळ कोकणात हजेरी लावेल आणि त्यानंतर सहा ते आठ जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात पोचेल, असा अंदाज आहे. 

मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती असल्यामुळे येत्या 72 तासांत मोसमी वारे अंदमान आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापून घेतील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मॉन्सूनच्या आगमनामुळे अंदमान-निकोबारमध्ये जोरदार पाऊस होईल. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. अंदमान दाखल झालेल्या मोसमी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असून, तो येत्या काही तासांत 50 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. अंदमान-निकोबार, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होईल. मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातील हवेचा दाब कमी झाला आहे. त्याचप्रमाणे उत्तर-पश्‍चिम मध्य प्रदेश आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र राज्यात द्रोणीय स्थिती, तर बिहार आणि झारखंड राज्यात चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. 

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि ओडिशामध्ये सोमवारी (ता. 15), तर छत्तीसगडमध्ये मंगळवारी (ता. 16) उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. 

मॉन्सून दाखल होण्याचा सर्वसाधारण कालावधी : 
- अंदमानात 20 मे रोजी होतो दाखल 
- केरळमार्गे देशात एक जूनला प्रवेश 
- तळ कोकणात 5 जूनपर्यंत हजेरी 
- महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत दाखल 
- संपूर्ण भारत 15 जुलैपर्यंत व्यापतो 

Web Title: Monsoon Andaman