मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापून नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. गोव्यातील मुरगाव येथे मॉन्सून पोचल्याचे हवामान खात्याने गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांत पोचेल, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

पुणे - कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापून नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. गोव्यातील मुरगाव येथे मॉन्सून पोचल्याचे हवामान खात्याने गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये मॉन्सून तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांत पोचेल, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 

केरळ किनारपट्टीवर 28 मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. त्यात कर्नाटकमध्ये मॉन्सूनने सात दिवस मुक्काम ठोकला होता. गुरुवारी हा मुक्काम त्याने हलवला. त्याने गोवा, आंध्र प्रदेशचा काही भाग व्यापला आहे. पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या शुक्रवारी (ता. 8) मॉन्सून सलामी देईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

महाराष्ट्र, तेलंगणच्या आणखी काही भागांत मॉन्सून येत्या शनिवारपर्यंत (ता. 9) दाखल होईल, तर सोमवारपर्यंत (ता. 11) संपूर्ण महाराष्ट्र, अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत मॉन्सून पोचण्याचे संकेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. मॉन्सूनच्या उत्तरेकडील वाटचालीस या कमी दाब क्षेत्रामुळे गती मिळण्याची शक्‍यता आहे. त्याची तीव्रता शनिवारी वाढून, ते वायव्येकडे सरकण्याचे संकेत आहेत. यामुळे उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम व मेघालयात पावसाचा जोर वाढून, या भागातही मॉन्सून दाखल होईल. दरम्यान, पश्‍चिम बंगाल, ओडिशाच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणात रविवारपर्यंत  मुसळधार पाऊस 
मॉन्सूनच्या आगमनास अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने रविवारपर्यंत (ता. 10) मुंबईसह कोकणात, तर शनिवारपर्यंत (ता. 9) कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी; तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण किनाऱ्यालगत वेगाने वारे वाहणार आहे. या वाऱ्यामुळे समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Web Title: Monsoon on the Maharashtra