मॉन्सूनची ‘एन्ट्री’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

कमी दाबक्षेत्राची निर्मिती
उत्तर-मध्य प्रदेश आणि दक्षिण उत्तर प्रदेश परिसरावर असलेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी विरून गेले. तर बंगालच्या उपसागरात ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच पंजाबपासून उपसागरातील कमी दाबापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर शनिवारपासून (ता. २२) सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून त्यानंतर पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही काही दिवस अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले.

मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली. त्यानंतर किनारपट्टीच्या भागात वेगाने प्रगती करत मॉन्सूनने गुरुवारी संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी, गोवा राज्य व्यापून दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत मजल मारली. पूर्व भारतातील पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांत प्रगती करत मॉन्सूनने कोलकत्यापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत समुद्राला उधाण आले असून, जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती आहे. रविवारपर्यंत (ता. २३) कर्नाटक महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडू व्यापून आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, बिहार, झारखंड, ओडिशाच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

मॉन्सून प्रवासाच्या इतिहासात प्रथमच मंगळूर ते रत्नागिरी एवढा मोठा टप्पा पावसाने पार केला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार झाले आणि मॉन्सूनला पोषक स्थिती निर्माण झाल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याने सांगितले. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत.

गोव्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. मॉन्सून सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांनी भातशेती लावण्यास सुरवात करावी, असे आवाहन कृषी संचलकांकडून करण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी ती अद्यापही चालू आहेत. पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्‍यता वेधशाळेने व्यक्त केल्या कारणाने शेतकऱ्यांनी भातशेतीची रोपे लावण्यास सुरवात करावी, असे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Rain Arabian Sea Konkan Maharashtra