मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी 'वायू' हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असतानाच हे चक्रीवादळ पश्‍चिमेकडे वळाले. गुजरात किनाऱ्यापासून दूर जात असतानाच त्याची तीव्रताही कमी झाली. आता याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे.

पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. मॉन्सूनच्या अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. परिणामी मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता.२१) लांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. आजपासून (ता.१८) कोकणात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची तर उर्वरीत राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी 'वायू' हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असतानाच हे चक्रीवादळ पश्‍चिमेकडे वळाले. गुजरात किनाऱ्यापासून दूर जात असतानाच त्याची तीव्रताही कमी झाली. आता याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. हे क्षेत्र गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर पुढील दोन दिवसांमध्ये पोचेल. त्यामुळे कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

चक्रीवादळामुळे बदललेल्या वातावरणाचा थेट परिणाम अरबी समुद्रावरून येणाऱ्या मॉन्सूनवर झाला आहे. दक्षिण कर्नाटकात पोचलेल्या मॉन्सूनच्या शाखेने गेल्या तीन दिवसांपासून तेथेच मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रातही मॉन्सूनचे आगमन लांबले आहे. साधारणपणे 7 जूनपर्यंत तळकोकणात मॉन्सूनचे आगमन होते, तर 10 जूनपर्यंत मॉन्सून पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापतो. त्यानंतर 15 जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करत, पूर्व भारतातील राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा बहुतांशी भाग व्यापतो. यावर्षी सुरवातीपासून अडखळणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon rain arrived in Maharashtra on friday