मॉन्सूनचा परतीचा प्रवास तब्बल महिन्याने लांबला

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मॉन्सूनचा उत्तर भारतातून परतीचा प्रवास बुधवारी सुरू झाला. राजस्थान, पंजाब आणि हरियाना येथून मॉन्सून परतल्याचे भारतीय हवामान खात्याने बुधवारी जाहीर केले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा सर्वांत उशिरा परतणारा हा मॉन्सून ठरला.

पुणे - मॉन्सूनचा उत्तर भारतातून परतीचा प्रवास बुधवारी सुरू झाला. राजस्थान, पंजाब आणि हरियाना येथून मॉन्सून परतल्याचे भारतीय हवामान खात्याने बुधवारी जाहीर केले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा सर्वांत उशिरा परतणारा हा मॉन्सून ठरला. 

सर्वसाधारणतः पश्‍चिम राजस्थानमधून एक सप्टेंबरला मॉन्सून परतीचा प्रवास सुरू करतो. मात्र, या वेळी ९ ऑक्‍टोबर तारीख उजाडली. यापूर्वी १९६१ मध्ये एक ऑक्‍टोबरला; तर २००७ मध्ये ३० सप्टेंबरला मॉन्सून देशातून परत फिरला होता. त्यामुळे यंदा सर्वांत उशिरा परतणारा मॉन्सून, असे वर्णन हवामान खात्याने केले आहे.

राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारपासून (ता. १२) विदर्भात हवामान कोरडे होण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी; तर मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. उर्वरित भागात ढगाळ हवामानासह तापमानाही वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon rain environment