विधानसभेत राजदंडाची पळवापळवी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

शिवसेना आमदार व नितेश राणे याच्यांत झटापट, "नाणार'वरून रणांगण

शिवसेना आमदार व नितेश राणे याच्यांत झटापट, "नाणार'वरून रणांगण
नागपूर - नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे या मागणीवरून शिवसेना आमदारांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. चार वेळा कामकाज तहकूब केल्यानंतरही शिवसेना आक्रमक असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, या वेळी विधानसभा अध्यक्षांच्या समोरील राजदंड पळवण्यासाठी शिवसेना आमदार राजन साळवी, प्रताप सरनाईक याची व कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांची प्रचंड झटापट झाली. सत्ताधारी पक्षानेच सभागृहातला मानाचा राजदंड पळवण्याची ही पहिलीच घटना असल्याने इतर पक्षाचे आमदार हवालदिल झाले आहेत.

आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सहकार व पणनच्या प्रस्तावावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर दिले. त्यानंतर शिवसेना आमदारांनी नाणारचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटे तहकूब करण्यात आले. सलग तीन वेळा कामकाज तहकूब केल्यानंतर राजन साळवी यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान नितेश राणेही धावले व राजदंड हिसकवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू असताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईकदेखील धावून गेले व त्यांनी नितेश राणेंना खेचत राजदंडावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विधानसभेतील सुरक्षा रक्षकांनी राजदंड आपल्या ताब्यात ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. पण या झटापटीमध्ये सुरक्षारक्षक खाली कोसळले. अखेर हा संघर्ष पाहून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.

त्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात फेरी मारत नाणार विरोधी घोषणाबाजी केली.

विखेंचा इशारा
शिवसेना आमदारांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत विधानसभेत गोंधळ घातला. त्याच वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव देत नाणारवर बोलण्याची संधी मागितली. मात्र शिवसेना आमदारांच्या आक्रमक रणनितीने कामकाज रोखून धरले. अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून संताप व्यक्त केला. सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाला अध्यक्ष बळी पडून कामकाज तहकूब करणार असतील तर, हा घ्या माझा राजीनामा असा संतापजनक खेद व्यक्त केला.

Web Title: monsoon session vidhansabha Scepter shivsena mla nitesh rane confussion