पोलिस अधिकाऱ्यांसाठी 'गूड न्यूज', सहाशेपेक्षा अधिक जणांना मिळणार पदोन्नती

more than 600 police will get promotion soon in maharashtra
more than 600 police will get promotion soon in maharashtra

नागपूर : गेल्या वर्षभरापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य पोलिस दलातील जवळपास सहाशेवर सहायक पोलिस निरीक्षकांना लवकरच 'गुड न्यूज' मिळणार आहे. येत्या आठवड्याभरात त्यांना पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्य पोलिस दलात आनंदाचे वातावरण आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नत्यांमध्ये अनियमितता होती. त्यामुळे राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. गेल्या वर्षभरापासून सहायक पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत होते. मात्र, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नव्हता. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्‍न रखडला होता. पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे अधिकारी मन मारून काम करीत होते. कालबद्ध पदोन्नतीची वाट पाहत अनेक अधिकारी दिवस काढत होते. याचा परिणाम तपास, बंदोबस्त आणि पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाजावरही पडत होता. शेवटी डीजी कार्यालयाने पोलिस अधिकाऱ्यांची मनःस्थिती लक्षात घेत पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला. गेल्या चार फेब्रुवारीपर्यंत सहायक पोलिस निरीक्षकांना संवर्ग मागण्यात आला होता. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर आस्थापना विभागाने नुकताच पदोन्नतीची यादी तयार केली असून त्यामध्ये ६०० पेक्षा जास्त एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. आठवड्याभरात पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्‍नती देण्यात येणार आहे. या यादीची प्रतीक्षा एपीआय अधिकारी करीत असून अनेकांनी क्रिम पोस्टींगसाठी सेटिंग लावणे सुरू केले आहे. अनेकांनी ठाणेदारी मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तसेच काहींनी फक्त मुंबई किंवा पुणे या शहरासाठी तयारी केली असल्याची माहिती मिळाली आहे. 

पीएसआय अधिकाऱ्यांना 'डोहाळे' -
पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्यापासून पहिल्या पदोन्नतीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या पीएसआय अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे डोहाळे लागले आहेत. जवळपास ८ पेक्षा जास्त पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात येणार आहे. एपीआय अधिकाऱ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर रिक्त जागांवर उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारीसुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. 
नागपुरातील २२ अधिकाऱ्यांना 'लॉटरी' -
शहर पोलिस दलातील एका महिला अधिकाऱ्यांसह २२ एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची 'लॉटरी' लागली आहे. यामध्ये अर्धेअधिक अधिकारी गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांतील डीबीमध्ये चांगले काम केलेले आहेत. सहायक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती आणि खात्यातून सेवानिवृत्तीमुळे निरीक्षकांची अनेक पदे रिक्त झालेले आहेत. त्यामुळे यावर्षी अनेकांना निरीक्षक पदावर पदोन्नतीची सुवर्ण संधी मिळणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com