Mother's Day : ऐन तारुण्यात पतीचं निधन! दुसऱ्या लग्नाचा विचार टाळून ‘तिने’ मुलासाठी घेतले वाहून

Mother's Day
Mother's Day

- अनिल जमधडे

छत्रपती संभाजीनगर : लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच ऐन तारुण्यात म्हणजे १९ व्या वर्षी पतीचे अपघाती निधन झाले. आठ महिन्याचा मुलगा असल्याने दुसऱ्या लग्नाचा विचार न करता, मोठ्या हिमतीने मुलाचा सांभाळ केला.

जगण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी पत्करली. मुलाचा सांभाळ करून त्याला पदवीपर्यंतचे शिक्षण दिले, मुलगा सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. लवकरच तो स्पर्धा परिक्षेत यश मिळवेल, तेव्हा खरा आनंद होईल, असा आशावाद शबाना मुश्ताक शेख यांनी व्यक्त केला.

शबाना मुश्ताक शेख, (रा. बाभुळगाव, ता. वैजापूर) सांगत होत्या... ‘‘वयाच्या १७ व्या वर्षी माझे लग्न झाले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच संसाराला नजर लागली. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षातच पतीचे अपघाती निधन झाले. त्यावेळी माझ्या पदरी आठ महिन्याचा मुलगा फैजल होता.

पतीचे अचानक निधन झाले आता जगायचे कसे? मुलाला वाढवायचे कसे? असे यक्षप्रश्न माझ्या समोर होते. कधी कधी आयुष्य नको वाटायचे. कितीतरी वेळा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला. पती गेल्यावर सासरचे घर माझे राहिले नाही. माहेरच्या घरी ओझे म्हणून घरात ठेऊन घेतले गेले.

माहेरी राहण्यासाठी घर मिळाले पण पोटापाण्याचा आणि मुलांच्या जबाबदारीचे काय? असा प्रश्न भेडसावत होताच. त्याच वेळी गावात अंगणवाडीची भरती होत असल्याची माहिती मिळाली होती. घरातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही हे नक्की होते. मी अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी करायची की नाही या ‘हो’ ‘नाही’च्या संघर्षात काही वेळ गेला. नोकरी करण्यापेक्षा माझ दुसरे लग्न लावून देऊ अशी चर्चा घरात होत होती.

पण माझे लग्न लावून दिले तर मुलाचे काय होणार? मुलाशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ राहणार नाही याची जाणिव होती. या सगळ्याचा विचार करून शेवटी आपल्या हातात पैसा असेल तर आपण मुलाचे भवितव्य घडवू शकतो हा निर्धार मनाशी करून अंगणवाडी सेविकेच्या नोकरीसाठी अर्ज केला. यात यशही आले आणि माझ्या आयुष्याचा दुसरा टप्पा सुरू झाला.

तो’ दिवस असेल खरा आनंदाचा

अंगणवाडीचे काम करता करता मुक्त विद्यापीठातून बीएपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केल. मुलगा मोठा होत होता, त्याला चांगले शिक्षण द्यायचे एवढा एकच विचार मनात ठेऊन माझे काम सुरू होते. अंगणवाडी सेविका म्हणून आता गेली पंधरा वर्ष काम सुरू आहे. अंगणवाडीतून मुलांना घडवतानाच मुलाच्याही भवितव्यासाठी झटत आहे. आज माझा मुलगा १९ वर्षाचा झाला असून त्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पोटाला चिमटा घेऊन शिकण्यासाठी पुण्यात ठेवले आहे. आज मुलगा फैजल हा बीएससी पदवीचे शिक्षण घेत आहे. त्यासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारीही तो जिद्दीने करीत आहे. त्याच्या स्पर्धा परिक्षेला एकदा यश आले की तो खरा दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल.

"आई या शब्दाची फोड केली तर ''आ ''म्हणजे आत्मा आणि ''ई'' म्हणजे ईश्वर, असा त्याचा अर्थ होतो. आपल्या शरीरात आत्मा जसा सोबत असतो तशीच आई आपल्यासोबत असते. आपल्या आयुष्यातील प्रसंग, क्षण कोणताही असो. आपण आनंदी असलो तर आशीर्वाद देण्यासाठी आणि दू:खात असलो तर धीर देण्यासाठी. सर्व परिस्थिती आपल्या पाठीशी असते ती आई. हेच शबाना मुश्ताक शेख यांच्या संघर्षातूनही हेच स्पष्ट होते."

— रेणूका कड (सामाजिक कार्यकर्त्या)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com