
Prashant Corner Case: श्रीकांत शिंदेंची पत्नी आणि मिठाईच्या दुकानाचा वाद! काय आहे संपूर्ण प्रकरण
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले प्रशांत कॉर्नर चर्चेत आले आहे. याच कारण म्हणजे सुरू असणाऱ्या अफवा. सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्यानंतर यासंबधीच्या अफवा पसरवून त्यांची बदनामी केल्याप्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Latest Marathi News)
काय आहे प्रकरण?
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीस योग्य वागणूक दिली नाही म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्याच समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आलं होतं. अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याची तक्रार प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिली होती. या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांचे वाहनचालक आणि दुकानाचे सुरक्षारक्षक यांच्यात दुकानाबाहेर वाहन उभे करण्यावरून वाद झाला. त्यानंतर दुकानातही टोकन घेण्यावरून वाद झाला. वृषाली शिंदे खरेदी न करताच रागारागाने दुकानाबाहेर निघून गेल्या. त्यानंतर, काही वेळातच ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ‘प्रशांत कॉर्नर’ दुकानाच्या बाहेरील शेड व इतर बांधकाम उध्वस्त केल्याचा, असा आरोप अजय जया यांनी केला होता. (Latest Marathi News)
ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात हे सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर हे मिठाईचे दुकान आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी दुकानाबाहेरील भागात एक कट्टा आणि शेड बांधण्यात आलेला. हा कट्टा आणि शेड बेकायदा असल्याचे सांगुन ठाणे महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. मात्र, या दुकानाशेजारीच असणाऱ्या इतर दुकानांसमोरील कट्टे आणि शेड यांच्यावर कारवाई झालेली नव्हती.(Latest Marathi News)
यामुळे या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत असतानाच, धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांनी केलेल्या पोस्टमुळे खळबळ उडाली होती.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीला कोणतीही अपमानास्पद वागणूक मिळालेली नसताना आणि केवळ वाहन उभे करण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान जर, अशपद्धतीने सुड उगावून होणार असेल तर, ठाणे शहरात नक्कीच ‘मोगलाई’ अवतरली आहे की काय? असेही त्यांनी म्हंटले होते.
या आरोपानंतर प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. अजय यांनी केलेले सर्व आरोप निराधार, खोडसाळ आहेत अशी घटना घडलीच नसल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. दुकानावर जी कारवाई झाली, ती महापालिका स्तरावर झाली असून आजूबाजूच्या दुकानांवरही झाली आहे. परंतु या कारवाईबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्या नावाचे पत्रक काढून उल्लेख केला आहे, तो चुकीचा आहे असं त्यांनी म्हंटलं आहे.
तर वृषाली शिंदे यांचा या कारवाईशी काहीच संबंध नाहीये. त्या आमच्या दुकानात कधी आल्या नाहीत, मी त्यांना ओळखतही नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचे नाव जोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचं प्रशांत कॉर्नरचे मालकांनी म्हंटले आहे.