स्त्रीला दाक्षिण्य मानणाऱ्या माणसाच्या हवसवृत्तीनं टोक गाठलंय; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

बलात्कारांच्या घटनेला सरकार जबाबदार आहेच, परंतु सर्व समाज आणि मानवजात देखील जबाबदार आहे.

स्त्रीला दाक्षिण्य मानणाऱ्या माणसाच्या हवसवृत्तीनं टोक गाठलंय

सातारा : मुंबईच्या साकीनाका (Saki Naka) परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार (Mumbai Sakinaka Rape) करण्यात आल्याची संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडलीय. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलंय. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी या कृत्याबाबत संताप व्यक्त केला असून आरोपला कडक शासन व्हावे, अशी मागणी केलीय. या घटनेला सरकारच जबाबदार असल्याचंही त्यांनी ट्विटव्दारे सांगितलंय.

खासदार उदयनराजे म्हणाले, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या साकीनाका परिसरातील घडलेल्या घटनेत क्रुरता-विकृती-वासनेला बळी पडलेल्या महिलेची जगण्याची झुंज अयशस्वी ठरली. काळीमा फासणारी ही अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. या घटनेचा दुःख, खेदही वाटतोच. परंतु, त्याही पेक्षा मनस्वी संताप येतोय. राज्यातील आणि देशातील स्त्री असुरक्षित असेल, तर आपण विकासाच्या गप्पा कोणत्या धारणेवर करतो, हा प्रश्न पडलाय.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार : SC-ST आयोग तपासावर समाधानी; मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा

स्त्री दाक्षिण्य मानणाऱ्या माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले आहे. या व अशा बलात्कारांच्या घटनेला सरकार जबाबदार आहेच, परंतु सर्व समाज आणि मानवजात देखील जबाबदार आहे. कायदा आंधळा आहे. परंतु, तो नेहमीच न्यायिक निवाडा करतो. मात्र, जरब बसेल अशा शिक्षांची तरतूद आयपीसी-1860 मध्ये करावी लागेल. तसेच राज्याने बलात्काराच्या बाबतीत कायदेतज्ञांशी विचारविमर्श करुन, वेगळी दंड निती/संहिता अस्तित्वात आणावी, अशी त्यांनी मागणी केलीय. या घटनेची शहानिशा तातडीने करुन, क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षाच झाली पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केलीय.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस

साकीनाका बलात्कार पीडितेचा मृत्यू

मुंबई येथील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली. या महिलेची प्रकृती गंभीर होती. तिच्यावर मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Mp Udayanraje Bhosale Expressed Anger Over Sakinaka Cases In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Udayanraje Bhosale