दोन ओळखपत्र दाखवा अन् परीक्षा द्या ; एमपीएससीकडून पारदर्शकतेचा नवा फंडा

विकास गाढवे
शनिवार, 7 एप्रिल 2018

रविवारच्या परीक्षेपासून आयोगाने पहिल्यांदाच उमेदवारांना परीक्षेत सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नोंद करण्याची सक्ती केली आहे. यासाठी परीक्षा संपल्यानंतर दोन मिनिटे जादा वेळ दिला असून या वेळेत केवळ सोडवलेल्या प्रश्नांची संख्या मोजून अचूकपणे नोंद करावी लागणार आहे.

लातूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या मागील काही वर्षातील परीक्षेत डमी उमेदवार आढळून आल्याने दूध पोळल्यानंतर आयोगाने रविवारी (ता. आठ) होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेपासून `ताकही फुंकून` पिण्यास सुरवात केली आहे. यातूनच आयोगाने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवा फंडा सुरू केला आहे. यात उमेदवारांना आता दोन ओळखपत्र दाखवून स्वतःची ओळख पटवून द्यावी लागणार आहे. यासोबत परीक्षेत सोडवलेल्या प्रश्नांची संख्याही उत्तरपत्रिकेवर नोंद करावी करावी लागणार असून आयोगाने त्यासाठी आगाऊ दोन मिनिटांचा कालावधी दिला आहे.

पारदर्शकेच्या प्रयत्नांत रविवारी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्रावरील (हॉल तिकीट) सुचनांच्या संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. मागील वर्षी याच परीक्षेच्या प्रवेशपत्रावर असलेली सुचनांची 34 संख्या यंदा 59 पर्यंत पोहचली आहे. सुचनांच्या या मांदियाळीमुळे उमेदवार पार गोंधळून गेले आहेत. परीक्षेसाठी आतापर्यंत एक ओळखपत्र व त्याची स्वाक्षांकित प्रत घेण्यात येत होती. आता आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान दोन मूळ ओळखपत्र दाखवून त्याच्या प्रती समवेक्षकासमोर स्वाक्षांकित करून द्याव्या लागणार आहेत. पूर्वी परीक्षा कक्षात वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षेला प्रवेश दिला जाणार नसल्याच्या सूचनेत आयोगाने वाढ केली आहे. आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी आदी ऐनवेळी उदभवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेता आयोगाने उमेदवारांना वेळेच्या अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक केले असून वेळेनंतर उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश न देण्याची पूर्वीची भूमिका कायम ठेवली आहे

उत्तरपत्रिकेचा भाग दोन सांभाळून ठेवा

उत्तरपत्रिका तसेच उत्तरपत्रिकेसोबत असलेल्या कार्बनलेस उत्तरपत्रिकेसाठी आयोगाने तब्बल एकेवीस सूचना दिल्या असून कार्बनलेस उत्तरपत्रिका उमेदवारांना आता अनेक दिवस सांभाळून ठेवावी लागणार आहे. निवड प्रक्रियेत आयोगाकडून जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी सातत्याने विविध प्रकारची पडताळणी व तपासणी करण्यात येते. यामुळे उमेदवारांतील प्रामाणिकपणा व शिस्तीची पडताळणी करण्यासाठीही प्रयत्न होतात. यातूनच पुढील काळात कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांकडील उत्तरपत्रिकेचा भाग दोन मागवला जाऊ शकतो. यामुळे हा भाग दोन उमेदवारांना निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सांभाळून ठेवावा लागणार आहे. यासह उत्तरपत्रिकेवर ओळखीच्या खूणा तसेच अन्य प्रकार न करण्याबाबतही आयोगाने उमेदवारांना सविस्तर सूचना दिल्या आहेत.

प्रश्नांच्या संख्येसाठी दोन मिनिट

रविवारच्या परीक्षेपासून आयोगाने पहिल्यांदाच उमेदवारांना परीक्षेत सोडवलेल्या प्रश्नांची संख्या नोंद करण्याची सक्ती केली आहे. यासाठी परीक्षा संपल्यानंतर दोन मिनिटे जादा वेळ दिला असून या वेळेत केवळ सोडवलेल्या प्रश्नांची संख्या मोजून अचूकपणे नोंद करावी लागणार आहे. या वेळेत अन्य कोणतीही कृती करण्यास आयोगाने प्रतिबंध केला आहे. सोडवलेल्या प्रश्नांची संख्या लिहिण्यासाठी दोन मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळणार नसल्याचेही आयोगाने सूचनांमध्ये म्हटले आहे.     

दाब देऊन वर्तुळ गिरवा

आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेचा भाग दोन (कार्बनलेस उत्तरपत्रिका) ही आजपर्यंत न उलघडणारे कोडे आहे. उत्तरपत्रिकेवर सोडवलेल्या प्रश्नांच्या उत्तराचे वर्तूळ अनेकदा उमटतच नाही. कार्बनचा छाप व्यवस्थित पडत नाही. उमेदवारांना प्रयत्न करून अचूक उत्तराचा शोध घ्यावा लागतो.

यावर आयोगाने उमेदवारांनाच उत्तरपत्रिकेवर प्रश्नांच्या उत्तराचे वर्तूळ आवश्यक दाब देऊन गिरवण्याचा सल्ला दिला आहे. यातून वर्तुळाचा चांगला छाप उत्तरपत्रिकेच्या कार्बनलेस प्रतीवर उमटेल, याची दक्षता घेण्याचा आग्रहही आयोगाने धरला आहे.

Web Title: MPSC News Exam Identity Card show Transperancy