हिंगणघाट जळीतकांड: मन सुन्न... विषण्ण...

mrunalini naniwadekar write hinganghat article
mrunalini naniwadekar write hinganghat article

अंकिताला भर चौकात जाळले. तिच्या गावातल्या एका नराधमाने. श्‍वसनमार्गच जळल्याने उपचारांवर मर्यादा आल्या होत्या,ती गेली.वर्ध्यातल्या तिच्या गावी त्या तरूण स्वप्नाचे कलेवर पोहोचले तेंव्हा अस्वस्थ वर्तमान शारीर रूपात उभे होते. हताशा अशा वेळी हिंसेत बदलते. त्यामुळे तिचा असहाय देह घरी परतला तेंव्हा त्या वाहनावरच दगडफेक झाली. वाईट असते असा कायदा हातात घेणे पण त्या शिवाय जनतेच्या हाती असते तरी काय ? छोटयाशा खेडयातले ते जीवन. शेतीचे प्रश्‍न बिकट, त्यातून मार्ग काढायचा असेल तर शिक्षण ही एकमेव किल्ली. थोरामोठयांनी सांगितलेली. तिने ती वापरली होती. मुलगी शिकली प्रगती झाली ही भिंतीवर दिसणारी वाक्‍ये तिच्या आई-वडिलांनी प्रत्यक्षात आणली होती. गावात बऱ्यापैकी दिसणारे ते घर मुलीच्या कर्तृत्वाने उजळून निघाले होते. गावातल्या कित्येक मुलींनी तिला आदर्श मानले असेल अन त्यांच्या आयांनी नवऱ्याच्या मागे लागून हे उदाहरण गिरवण्याचा आग्रह धरला असेल. सगळे संपले एका नराधमाच्या आततायीपणाने. बसमधली जाण्या-येण्यापुरती ओळख. दारोडाहून हिंगणघाटपर्यंत जायचे एवढीच बसमधली जानपहचान. प्रेमप्रकरण म्हणावे तर हा नराधम विवाहित. घरी दोन महिन्याची मुलगी पत्नीच्या कुशीत. अंकिताचा याच्याशी कोणताही संबंध नाही, आणाभाका नाहीत की वचने नाहीत. माझ्या प्रेमात पड असा त्याचा आग्रह. तो अंकिताने जुमानला नाही एवढाच काय तो तिचा गुन्हा. त्या नकारामुळे तिला याने जाळले. बायको तर नात्याने बांधलेली. ती जीवंतपणी जळत राहील. लहानगी पोरगी ही त्याची मुलगी हा कलंक कायम अश्‍वत्थाम्याच्या कधीही भरुन न येणाऱ्या जखमेसारखा भाळी वाहील. आई-वडिलांचा आधार झालेली गावात राहून शिकलेली मुलगी. कित्येक मुलींची रोलमॉडेल असणार ती. तिला असे संपवून टाकल्यामुळे या मुलींच्या घरी आपल्या लाडकीला बाहेर पाठवायचे की नाही असा प्रश्‍न पडला असेल.
........................
खोल आतली अस्वस्थता महिला तरुणींना छळत असेल. ती व्यक्‍त होईल काही काळाने कदाचित शिक्षण संपवून, अर्ध्यात थांबवून. पण आजचा प्रश्‍न वेगळा. अंकिताच्या घरचे कुटुंबाचे तीव्र पण गाववाडीचेही. कॅमेरे गावात पोहोचले आहेत. माध्यमे सबसे तेज धावण्याच्या प्रयत्नात आहेत. तसे ते 26/11 लाही होतेच. पण त्या वेळी त्यांच्याबददल जो राग दाटून येई ती आज विषण्णतेने घेतलेली आहे. विदर्भातल्या वर्धा जिल्हयातले हिंगणघाट हे तसे आडगाव. त्यातलेही कुठल्या तरी टोकावरचे दारोडा. गावातला कोपरानकोपरा खचाखच भरलेला. खरे तर हे शेतीचे दिवस. पण आजकाल ती करतेच कोण? तरूण तर नाहीच नाही. पानपटटीला तिकडे पानठेले म्हणतात. पूर्वी तिथे बरी मुले उभी राहिली तर घरी बापापर्यंत तक्रार जायची. आता सगळे गाव पाराऐवजी पानटपरीवर असते. आल्या दिवसाला शे-दीडशे मंडळी गप्पा हाणायला हजर. आज तर आक्रीत घडलेले. गाव खेडयातला आक्रोश काही झाले की सरकारच्या दिशेने वळतो. पोलिस त्या मायबाप सरकारचे रूप. वर्दीत असल्याने ओळखू येणारे. अंकिताला घेवून आलेल्या ऍम्बुलन्सवर या विषण्ण मनांनी अन रिकाम्या हातांनी म्हणूनच दगड उचलले असतील काय? शेतमालाला दाम नाही, हाताला काम नाही. शिक्षणाने शेती निम्न दर्जाची ठरवलेली. अन उदयोग नागपुरातल्या मिहानमध्येच अडकलेले. हा संपूर्ण परिसर निमूटपणे दु:खाचा पेला जवळ करणारा. व्यसनाधीनता बरीच. छुप्या मार्गाने सारे सुरू. कधीही पेटून न उठणारा हा परिसर गांधीजींची कर्मभूमी. पण गेली दोन दशके नकोसे झाले की फास आवळून जगणं संपवणारे शेतकरी हेच येथले वास्तव. भीषण, बकाल. आत्महत्याग्रस्ततेचा शाप पुसला गेला नाहीच राजवटीआल्या अन गेल्या तरी.
.................
आज अंकिता गेली तर बायाबापडया चिडताहेत हे बघून काहीतरी धुमसतेय याचे बरं वाटून घ्यायचे की अकारण संपलेल्या एका तरुणीच्या छोटया जीवनप्रवासामुळे आता मुलींच्या वाटेवरच्या काचा पुढची मार्गक्रमणा संपवेल ?
अंत्ययात्रा पार पडेल, गोळा झालेली मंडळी घरी जातील. रिकाम्या खिशात हात घालून आभाळाकडे डोळे लावून बसेल. अंकिता परत येणार नाही हे घरचे समजून घेतील. पण तिला जीवंतपणी सतीप्रमाणे जाळणाऱ्या त्या उलटया काळजाच्या विकेश उर्फ विकीचे काय ? संस्कार कमी पडले. त्यात कुटुंबाचा दोष अन समाजाचाही. की आईच्यावडिलांच्या ऐकण्यातला नव्हताच तो. निर्भयाला रात्री भोगून पाचोळ्याप्रमाणे मारून टाकणारे ते चौघेही कुण्या आईचे कुण्या बहिणेचे होतेच की. तंदूरमध्ये तरूणीला टाकून देणारी अतीश्रीमंत मंडळीही त्यातलीच. मुली घराबाहेर पडताहेत. शिकताहेत, कुटुंबातून त्यांना प्रोत्साहन मिळते आहे. छेडखानी, विनयभंग, बलात्कार घटना वाढताहेत पण तरी मुली समोर येताहेत, जीवनाला भिडताहेत. त्यांना मदत करणारे कृष्णसखेही पांडव शंभर असले तरी एखादा कौरव सगळी माती करतो आहे. मोठया प्रमाणात यशस्वी झालेली स्त्रीहक्‍कांची चळवळ पाय रोवून उभी रहाते आहे. मॅरिटल रेपसारखे महिलासन्मुख कायदे करण्यापर्यंतची प्रगती साधलेला आपला देश प्रागतिक विचार करतो आहे पण विशाखा समितीही कागदावरच आहे, वर्मा कमिशनचा अहवाल आला खरा पण निर्भयाच्या गुन्हेगारांना अजून फाशी दिली गेलेली नाही. महिला हक्‍कांची लढाई लांब पल्ल्याची आहे. पण माणूस म्हणून सुरक्षा, त्या हक्‍काचे काय?
...............
अंकिताच्या कुटुंबाला नोकरीचे आश्‍वासन हवेय, गावातील काही मंडळी त्यासाठी आग्रही असावीत. हेही वैफल्याचे प्रगटीकरण आहे काय? प्रजासत्ताकाच्या 70 वर्षांनंतरही वर्तमान अस्वस्थ आहे. हैद्राबादला तरूणीवर बलात्कार करून तिला जाळून टाकणाऱ्या नराधमांना पोलिसांनी यमसदन धाडले. लगेच. फास्ट ट्रॅक. जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड म्हणतात. त्यामुळे जनतेला झटपट न्याय हवा आहे. गुन्हेगारांना धावायला सांगून बंदुकीच्या गोळ्यांनी टिपणारी दृश्‍ये लाईव्ह दाखवायची मागणी होईल काही दिवसांनी.

रिंकू पाटील, निर्भया, कोपर्डी, महालक्ष्मी मिल मुंबईतला बलात्कार... कहाण्यांना पूर्णविराम नाहीयेत. दररोज नव्हे तर दर मिनिटाला अत्याचार घडताहेत. अंकिता गेली पण गेल्या आठवडयात जळीताची सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. घरी सुनांना जाळले जाई हुंडयासाठी, आता हव्या असलेल्या मुलीने नाही म्हंटले तर जाळले जाते आहे. अंकिताला जाळले तेंव्हा चौकातल्या लोकांनी केले तरी काय? समाज म्हणून आपण शिकतो तरी काय? चितेवर जळणाऱ्या सतीला राममनोहर रॉय यांनी वाचवले, आता गरज वेगळी आहे. विकृत पुरूषी मानसिकतेला वेसण घालण्याची. जयवंत दळवींच्या नाटकात अंबिका बलात्कार करणाऱ्या गुलाबरावाचे लिंग छाटते. त्यांच्याच नाटकात बंडा नावाचा आक्रमक समाजसेवक अत्याचाऱ्यांना धडे शिकवतो. ते कथाकादंबरीत. प्रत्यक्षात गतीमान न्यायाची आवश्‍यता आहे अन तरूण पुरूषांच्या मनोवृत्तीत बदल करण्याची.
................
विकी उर्फ विकेश संख्येने जास्त नाहीत, रावण नराधम एखादाच असतो पण कित्येक अंकितांचे भविष्य त्यामुळे दावणीला बांधले जावू शकते. भीतीची ही तलवार अदृश्‍य स्वरूपात टांगलेली आहे. त्यामुळेच इंदिरा गांधींच्या भारताचे वर्तमान अस्वस्थ आहे, सुन्न विषण्ण. ते बदलण्यासाठी सकारात्मक, संवेदनशील बदल हीच अंकिताला खरी श्रध्दांजली ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com