महावितरणने केला 16 कोरोना वीजयोध्यांचा गौरव; उत्कष्ट उपकेंद्र, डिजिटल कार्यालयांना प्रमाणपत्र 

संतोष सिरसट 
Sunday, 16 August 2020

यांचा झाला गौरव 
शाखा अभियंता-तांत्रिक कर्मचारी ः विशाल नाईकनवरे, रोहित ढमाले (रास्तापेठ, पुणे), सन्नी टोपे, शेषनारायण फावडे (गणेशखिंड, पुणे), गणेश श्रीखंडे, गणेश लोखंडे (पुणे ग्रामीण), अमर कणसे, लक्ष्मण देबाजे (कोल्हापूर), अश्विनकुमारे बुचडे, गोविंद सागर (सांगली), रोहित राख, गोरख गावडे (बारामती), दत्तात्रय जरे, स्वप्निल जाधव (सातारा), हर्षवर्धन पाटील, आनंद कागदे (सोलापूर) 

सोलापूर ः कोरोनाच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात अखंडित वीजपुरवठा व ग्राहक सेवेसाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील 16 अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट उपकेंद्र व डिजिटल शाखा कार्यालयांना पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आले. 

कोरोना व निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीत वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडलनिहाय प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कोरोना वीजयोद्धा म्हणून निवड केली. यासोबतच ग्राहकसेवा, वसुली व सुरळीत वीजपुरवठ्याच्या निकषानुसार परिमंडलनिहाय एक उपविभागीय कार्यालय, महावितरण पोर्टल व ऍपद्वारे ऑनलाईन काम करणाऱ्या डिजिटल शाखा कार्यालय आणि बिघाडरहित व आदर्शवत उत्कृष्ट उपकेंद्रांची देखील मंडलनिहाय प्रत्येकी एक अशी निवड केली. प्रशासकीय सुधारणा, तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर, उत्कृष्ट ग्राहकसेवा यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक व मनोबल वाढविण्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयाने कर्मचारी व कार्यालयांच्या सन्मानाचा हा उपक्रम सुरु केला आहे. 
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे प्रादेशिकचे प्रभारी संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते पुणे परिमंडलमधील कोरोना वीजयोद्धा शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह डिजिटल शाखा कार्यालय व उत्कष्ट उपकेंद्रांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. यावेळी अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, शंकर तायडे, पूनम रोकडे उपस्थित होत. 

मंडलनिहाय डिजिटल शाखा कार्यालय, उत्कृष्ट उपकेंद्र ः गंगा व्हिलेज शाखा, ब्रम्हासन सिटी उपकेंद्र (रास्तापेठ, पुणे), शिवाजी हौसिंग शाखा, सुसगाव उपकेंद्र (गणेशखिंड, पुणे), आळंदी शहर शाखा, आळेफाटा उपकेंद्र (पुणे ग्रामीण), निगवे शाखा, नागाळा उपकेंद्र (कोल्हापूर), विटा शाखा दोन, कुमठे उपकेंद्र (सांगली), भाटघर शाखा, काटी उपकेंद्र (बारामती ग्रामीण), कोळेवाडी शाखा, सदर बझार उपकेंद्र सातारा (सातारा), नातेपुते शाखा दोन, अकोला उपकेंद्र (सोलापूर) 
परिमंडलनिहाय उत्कृष्ट उपविभागीय कार्यालय ः वारजे उपविभाग (पुणे), बारामती शहर उपविभाग (बारामती), मिरज ग्रामीण एक (सांगली). 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL honors 16 Corona Warriors; Certificate of Excellence, Digital Offices