महावितरणकडून साडेसात अश्‍वशक्तीच्या सौर कृषीपंपासाठी ऑनलाइन अर्ज घेण्यास सुरवात 

संतोष सिरसट
Sunday, 27 September 2020

कुणाला किती पैसे भरावे लागणार 
या योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या/अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता पाच टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्‍यक आहे. साडेसात अश्वशक्ती सौर कृषिपंपाची 8.9 टक्के जीएसटीसह किंमत तीन लाख 34 हजार 550 आहे. खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10 टक्के हिस्सा म्हणून 33 हजार 455 रुपये तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा म्हणून 16 हजार 728 रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

सोलापूर ः महावितरणच्यावतीने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु केली आहे. त्यामध्ये आता साडेसात अश्‍वशक्ती कृषीपंप घेणाऱ्या ग्राहकांकडून अर्ज मागवून घेतले जात आहेत. शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करुन या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे. राज्यात नव्याने साडेसात हजार साडेसात अश्‍वशक्तीचे सौर कृषीपंप दिले जाणार आहेत. 

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्‍य व्हावे याकरिता राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंप देण्यासाठी "मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना' सुरु केली आहे. योजनेत पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषीपंप बसविले आहेत. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी 75 हजार सौर कृषीपंप बसवायचे आहेत. 

महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे साडेसात अश्‍वशक्तीच्या सौर कृषीपंपासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावांची सुरक्षित पाणलोटक्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) 60टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावामधील विहीरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन साडेसात अश्वशक्तीचे सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. मात्र, कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये 60 मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये साडेसात अश्‍वशक्तीचे सौरपंप देण्यात येणार नाहीत. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/solar/ या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL starts accepting online applications for 7.5 hp solar agricultural pumps