महावितरण : प्रकाशपर्वाची यशस्वी 15 वर्षे- वाचा सविस्तर

file photo
file photo

नांदेड : कोविड-19 च्या संक्रमण अवस्थेतही गेल्या अडीच महिन्यापासून कोवीड यौध्दा म्हणून जीवाची पर्वा न करता जबाबदारीने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस एखाद्या यौद्ध्याला साजेस काम करत आहेत. 15 वर्षाच्या प्रकाशपर्वात ग्राहकाभिमूखतेची कास धरत यशश्वी वाटचाल सुरू आहे. तत्कालिन 'एमएसईबी'च्या पुनर्रचनेनंतर विद्युत वितरणाची जबाबदारी आलेल्या महावितरणने गेल्या 15 वर्षांत प्रचंड कामे केली आहेत. 

त्यात भारनियमनासारखा प्रश्न निकाली काढणे, वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण, ग्राहकांना ऑनलाईन वीजजोडण्या, मोबाईल ॲप, वीजबिल भरण्यासाठी विविध सुविधा, मीटर रीडिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा, वेळेवर व अचूक बिलांसाठी केंद्रिकृत बिलिंग प्रणाली, कृषिपंपांना मोठ्या संख्येने जोडण्या आदी कामे महावितरणने केली आहेत. " समृध्दीचे विकासाचे नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हे ध्येय महावितरणचे " हे ब्रीद घेऊन गेली 15 वर्षे दर्जेदार वीजपुरवठ्याबरोबरच ग्राहकांना समाधानी ठेवण्याचे आव्हान महावितरणने यशस्वीपणे पेलले आहे. विशेषत: गेल्या तीन ते चार वर्षांत महावितरणने ग्राहकसेवेचे नवीन मानदंड निर्माण केले आहेत.

मागणीएवढी म्हणजे सुमारे 12 हजार 500 मेगावॅट वीज उपलब्ध 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पुनर्रचनेनंतर म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीसह महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्या अस्तित्त्वात आल्या. तिन्ही कंपन्यांनी आपापल्या क्षेत्रात अतिशय समर्पित पद्धतीने काम केले. त्यामुळेच आज महाराष्ट्राला विद्युत क्षेत्रातला पूर्वलौकिक परत मिळतोय. 2005 साली यंत्रणा एवढी जर्जर होती की, मागणीएवढी म्हणजे सुमारे 12 हजार 500 मेगावॅट वीज उपलब्ध झाली असती तरी ती ग्राहकांपर्यंत वाहून नेण्याची क्षमता वितरण यंत्रणेत नव्हती. 

प्रकाशपर्वाची एक नवी वाटचाल सुरू 

आज महावितरणची यंत्रणा 24 हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीज वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी महावितरणने पायाभूत आराखडा टप्पा-1, टप्पा-2 तसेच दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक विद्युत विकास योजना यशस्वीपणे राबवल्या. महावितरण व्यवस्थापनाच्या प्रशासकीय दुरदृष्टीने व लोकाभिमुख धोरणांमुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महावितरणला नवा आयाम प्राप्त झाला. प्रकाशपर्वाची एक नवी वाटचाल सुरू झाली.

महावितरणची ग्राहक संख्या 1.69 कोटींवरून 2.66 कोटी एवढी

ग्राहकाला योग्य दाबाने दर्जेदार वीजपुरवठा करण्यासह अनुषंगिक सेवाही चांगल्या पद्धतीने मिळाव्यात यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. सर्व जोडण्यांसाठी पूर्वीचा किचकट अर्ज बदलून केवळ एक पानी अर्ज करण्यात आला. ग्राहकाला आपल्या दारात यायला लागू नये, म्हणून सर्व वीजजोडण्या ऑनलाईन देण्याची सोय करण्यात आली. सौभाग्यसारख्या योजनेमुळे शेकडो गावे व वाड्यावस्त्यांवरील लाखो घरात वीज पोचली. गेल्या 15 वर्षांत महावितरणची ग्राहक संख्या 1.69 कोटींवरून 2.66 कोटी एवढी प्रचंड वाढली.

केंद्रिकृत बिलिंग प्रणाली. ग्राहकाला वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेवर बिल

महावितरणने गेल्या साडेतीन वर्षांत ग्राहकसेवेसाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. त्यातील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे केंद्रिकृत बिलिंग प्रणाली. ग्राहकाला वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेवर बिल मिळावे यासाठी तसेच बिल भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ऑगस्ट-2018 पासून वीजबिल तयार करण्याची प्रक्रिया केंद्रिय स्तरावर सुरू झाली. देशातील विद्युत वितरण क्षेत्रात प्रथमच असा नावीन्यपूर्ण प्रयोग महावितरणमध्ये राबवण्यात येत आहे. आधीच्या बिलिंग पद्धतीमुळे वीजबिलांची छपाई ते ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी 7 ते 8 दिवस लागायचे. ग्राहकांना वेळेत बिल न मिळाल्यास तत्पर देयक भरणा सूट (प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट) मिळण्यास अडचणी यायच्या. केंद्रिय बिलिंग प्रणालीमुळे मोबाईल मीटर रीडिंग ॲपमुळे रिअल टाईम रीडिंग उपलब्ध होते. त्यामुळे त्वरित बिल तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत लवकर पोचते.

एसएमएस सेवेस सुरुवात करण्यात आली

मीटर रीडिंगमधील पारदर्शकतेसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी व इन्फ्रा रेड मीटर्स बसविली गेली. उद्योगांसाठी स्वयंचलित मीटर रीडिंगची यंत्रणा आली. ग्राहकाला वीजबिले भरण्यासाठी ऑनलाईनसह वीज बिल भरणा केंद्रांची सोयही आहे. आधुनिकतेची कास धरत महावितरणने ग्राहकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप विकसित केले. ग्राहकांना आता मोबाईल ॲपवरच बिलाचा तपशील पाहण्यासह त्यावरून बिलही भरता येते. ग्राहकांना बिलाची रक्कम, खंडित वीजपुरवठा आदी माहिती देण्यासाठी एसएमएस सेवेस सुरुवात करण्यात आली. 90 टक्के ग्राहकांनी या सेवेसाठी नोंदणी केलेली आहे.

तक्रारी सोडवण्याची जबाबदारी दोन विशेष टीमकडे 

ग्राहकांच्या सोयीसाठी एप्रिल- 2017 पासून नवीन जोडणी, नावात बदल आदींसाठी मुख्यालयात विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला. तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला. ग्राहकसेवेचा दर्जा उंचावल्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. त्यामुळे 24 तास सुरू असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रांचे आधुनिकीकरण करून वीजपुरवठा व वीजबिलांच्या तक्रारी सोडवण्याची जबाबदारी दोन विशेष टीमकडे देण्यात आली. महावितरणने आपल्या संकेतस्थळाचे स्वरूप मे-2018 मध्ये बदलून ते अधिक ग्राहकस्नेही केले. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता व कंत्राटदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला. तसेच कोणतेही कार्यादेश व देयक ईआरपी प्रणालीद्वारेच दिले जात आहे.

13.63 टक्क्यांपर्यंत कमी झाली

वीज वापरात शिस्त यावी म्हणून वीज चोरीविरुद्ध सातत्याने मोहिमा राबविण्यात आल्या व येत आहेत. तसेच पायाभूत आराखड्यात झालेल्या कामांमुळे 2005-06 साली 31.72 टक्के असलेली वितरण हानी आता 13.63 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्याबरोबरच जळणाऱ्या रोहित्रांचेही प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आलेले आहे.

वीजपुरवठा होण्याबरोबरच रोहित्र नादुरुस्त होण्याचा प्रश्न निकाली

गेल्या साडेतीन वर्षांत विजेच्या मागणीनुसार विजेच्या उपलब्धतेचे योग्य नियोजन केल्याने वीज खरेदी दर कमी करण्यात यश मिळाले. मार्च-2018 अखेर पैसे प्रलंबित असलेल्या 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणालीचे काम प्रगतिपथावर आहे. यात एका रोहित्रावर केवळ दोन शेतकऱ्यांना जोडणी दिल्याने सुरळीत वीजपुरवठा होण्याबरोबरच रोहित्र नादुरुस्त होण्याचा प्रश्न निकाली निघत आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची कामे जोमाने सुरू आहेत.

प्रगतीपुस्तक रोज बदलत असते

माहिती तंत्रज्ञानात, देशाच्या विद्युत क्षेत्राच्या तुलनेत महावितरणमध्ये खूप मूलभूत काम झाले. या आणि इतर चांगल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी इतर राज्यातील अनेक पथके येऊन गेली. महावितरणला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. अर्थात विजेच्या क्षेत्रात पूर्वीच्याच नव्हे तर कालच्याही लौकिकावर जगता येत नाही. प्रगतीपुस्तक रोज बदलत असते. त्यामुळेच सातत्याने सजग राहून ग्राहकराजा जास्तीत जास्त समाधानी कसा राहील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

80 हजार 862 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला

यापुढील काळातही दर्जेदार वीजपुरवठ्याबरोबरच ग्राहकाला समाधानी ठेवण्यात महावितरण यशस्वी होईल यात दुमत असण्याचं कारणच नाही. सद्यस्थितीत कोरोनाच्या संक्रमणामुळे सामाजिक भान ठेवत आपली सेवा अख्ंडीतपणे देत आहे. 80 हजार 862 अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाच्या पगारासोबतच आपापल्यापरिने शक्य तेवढी आर्थिक मदत केली आहे. ऊन, वारा, पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीची तमा न बाळगता महावितरणचे यौध्दे रात्रंदिन सेवा बजावत आहेत.

- धनंजय पवार, जनसंपर्क अधिकारी, परिमंडळ, नांदेड.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com