एसटी उभारणार अद्ययावत मार्गस्थ निवारे 

प्रशांत कांबळे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुंबई - राज्यातील एसटीच्या मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाली असल्याने महामंडळ आता 3500 अद्ययावत निवारे बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे विभागांत 128 निवारे "बांधा-वापरा-हस्तांतर करा' या तत्त्वावर बांधण्यात येतील. या ठिकाणी प्रवाशांना एसटीची तिकिटे काढता येणार आहेत. 

मुंबई - राज्यातील एसटीच्या मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाली असल्याने महामंडळ आता 3500 अद्ययावत निवारे बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे विभागांत 128 निवारे "बांधा-वापरा-हस्तांतर करा' या तत्त्वावर बांधण्यात येतील. या ठिकाणी प्रवाशांना एसटीची तिकिटे काढता येणार आहेत. 

आमदार आणि खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या एसटी मार्गस्थ निवाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. एसटी महामंडळाकडून देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामीण भागातील निवाऱ्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. त्यामुळे सहा जानेवारी 2018 रोजी एसटी महामंडळाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यात अद्ययावत मार्गस्थ निवारे उभारण्याचे आश्‍वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. त्यानुसार आता पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे विभागांत 128 निवारे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाने निविदा जाहीर केली असून, लवकरच मार्गस्थ निवाऱ्यांच्या कामाला सुरवात केली जाणार आहे. 

एसटीच्या मार्गस्थ निवाऱ्यांत स्वच्छतागृह आणि अन्य सुविधा नसल्याने प्रवाशांची, विशेषत: महिलांची गैरसोय होते. त्यामुळे नव्या मार्गस्थ निवाऱ्यांमध्ये स्वच्छतागृह, उपाहारगृह, तिकीट खिडकी आदी सर्व आवश्‍यक सोईसुविधा असतील, असे सांगण्यात आले. एसटी महामंडळाने दिलेल्या आरेखनानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग निवाऱ्यांचे बांधकाम करणार आहे. हे निवारे एसटी महांडळाकडे हस्तांतरित केले जातील. 

एसटी महामंडळातर्फे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील मार्गस्थ बस निवाऱ्यांची हालत अत्यंत खराब आहे. त्यामुळे तीन टप्प्यांत अद्ययावत निवारे उभारले जातील. त्या ठिकाणी देखभाल-दुरुस्तीच्या कामांतून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

Web Title: MSRTC is going to build modern shelters now