समाजाला प्रेरणा देणारा गणेशोत्सव 

आमदार मुक्ता टिळक
Saturday, 1 August 2020

समाजात ब्रिटिश सरकारच्या विरोधात जागृती करण्याबरोबर सर्वसामान्य जनतेला राजकीय आणि सामाजिक विचारांची जाणीव व्हावी, हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचा लोकमान्य टिळकांचा उद्देश होता.

टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला १२८ वर्षे झाली तरीही त्याच स्वरूपात आणि उत्साहात तो आजही सुरू आहे. टिळकांनी हा उत्सव सुरू करण्याचे ठरविले, त्यावेळी महाराष्ट्रात गणपतीचे उपासक मोठ्या प्रमाणावर होते. दक्षिणेतही याच प्रकारचा उत्सव होत असे. परंतु ते सर्व खासगी स्वरूपात होत होते. त्याला सार्वजनिक स्वरूप द्यावे असे टिळकांच्या मनात आले. लोकांच्या मनात असलेल्या उत्सवप्रियतेचा उपयोग समाजाला एकवटण्यासाठी केला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश होता. हा उत्सव आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय झाला आहे. सर्वसामान्य नागरिक एकत्र यावेत या विचाराबरोबर त्यांच्यापर्यंत राजकीय विचार पोचावा, त्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन तो भिडावा आणि आपण नक्की कोणत्या दिशेने जायचे याचा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात यावा हे गणेशोत्सवामागचे मुख्य कारण होते. ब्रिटिश सरकारने दिलेल्या सोयीसुविधांमुळे लोकांची सरकारकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती. लोकांच्या मनात सरकारबद्दल आपुलकी निर्माण होती का, असे दृश्य निर्माण व्हायला लागले होते. त्यावर नागरिकांमध्ये जागृती होण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. 

गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप द्यायचे असेल समाजातील सर्व जातिधर्माचे लोक एकत्र यायला पाहिजे हे टिळकांनी हेरले होते. त्यावेळच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे काही जातीच्या, धर्माच्या लोकांना देवापर्यंत जाता येत नव्हते. या उत्सवामुळे सर्वप्रथम देवाच्या अगदी पायावर डोके ठेवता येत होते. त्यामुळे त्या लोकांना दिलासा मिळाला त्यामुळे सार्वजनिक स्फुरण निर्माण झाल्याचे टिळकांनी नमूद केले आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत अपूर्व आहे, असे टिळकांना वाटले. त्याबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले. समाजाची एकत्र ताकद ब्रिटिशांना दिसावी हा त्यामागचा उद्देश होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप       

हिंदू धर्मात घराघरांत सण, उत्सव साजरे होत होते. त्याचा सार्वजनिक फायदा होत नव्हता. धार्मिक उत्सवात बदल कसा करता येईल याचेही मार्गदर्शन टिळकांनी केले. विविध मेळे घेणे, देशप्रेम जागृत करणे, आदींबाबत त्यांनी सांगितले. उत्सव नाही ते राष्ट्र मेल्यासारखे आहे, असे लोकमान्य म्हणत. उत्सवामुळेच लोक एकत्र येऊ शकतात. एकत्र यावे एवढाच मर्यादित उद्देश नव्हता, लोकांना राजकीय तसेच सार्वजनिक दृष्टी यावी, यासाठी लोकमान्यांनी कष्ट उपसले. आपले साध्य साधण्यासाठी वैचारिक गोंधळ असू नये असे त्यांना वाटत होते. 

त्यावेळी समाजातील काही मंडळींना हा उत्सव मान्य नव्हता. उत्सवात कमतरता असेल तर त्याचे पाप या उदासीन मंडळींच्या कपाळावर मारले पाहिजे. उत्सवात कमी असेल तर सांगा. सुक्षितांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे टिळकांनी त्यावेळी सांगितले. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना येणाऱ्या अडचणींची त्यांना माहिती होती. त्याचा त्यांनी बारकाईने विचार केला होता. समाजाला एकत्र करण्याचा उद्देश साध्य करण्याचा त्यांनी पूर्ण विचार केला होता. लोकसंग्रहाच्या जाणिवेची अभूतपूर्व देणगी टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukta Tilak writes article about Lokmanya Tilak memory centenary