'कोरेगाव भीमा'तील दंगल हे सरकारविरोधातील षड्‌यंत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - 'कोरेगाव भीमा येथे घडलेला प्रकार हे सरकारविरोधातील षड्‌यंत्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आगामी काळात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडण्याची शक्‍यता आहे. सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे घडत असून, विकासकामांच्या गतीने अस्वस्थ झालेली मंडळी यामागे असल्याचे गंभीर निवेदनही आज त्यांनी केले.

भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने ते बोलत होते. 'आगामी काळात अशी आव्हाने परतवून लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,'' असे भावनिक आवाहन करताना त्यांनी निवडणुकांची तयारी बूथ पातळीवर जाऊन करा, असेही सांगितले.

दादर येथील वसंत स्मृती परिसरात झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे षड्‌यंत्र रचले जाईल, अशी भीतीही त्यांनी आज व्यक्‍त केली. या षड्‌यंत्राला तोंड देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तिरंग्याखाली एकत्र यावे आणि विकासासाठी एक यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपची तिरंगा रॅली
केंद्र आणि राज्यातील सरकारची विकासकामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे; मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.

यापूर्वी सरकारच्या विरोधात विरोधकांकडून काढण्यात आलेला हल्लाबोल मोर्चा अपयशी ठरला. त्याचा कोणताही परिणाम राज्यातील जनतेवर झालेला नसल्याचा दावा करत पुन्हा काढण्यात येत असलेल्या हल्लाबोलचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: mumbaai news koregaon bhima riot government oppose planning