मुंबई ते औरंगाबाद केवळ दीड तासात

Highspeed-Railway
Highspeed-Railway

औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या एक तास २९ मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

अहवालातील नोंदीनुसार मुंबई- नाशिक अंतर केवळ ४७ मिनिटांत, तर मुंबई- नागपूर अंतर तीन तास ३४ मिनिटांत कापता येणे शक्‍य आहे. ७७२.३६ किलोमीटर लांबीचा हा लोहमार्ग तीन टप्प्यांत २०३५ पर्यंत पूर्ण होऊ शकतो. २०५० पर्यंतची संभाव्य लोकसंख्यावाढ लक्षात घेऊन हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला आहे. 

स्पेन सरकारच्या सहकार्यातून ‘डायमंड क्वॉडिलॅटरल’ प्रकल्पासाठीचा अहवाल ‘इनेको’ आणि ‘अडीफ’ या स्पॅनिश कंपन्यांनी भारत सरकारच्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनसाठी (एचएसआरसी) तयार केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई- नागपूर दरम्यान ७७२.३६ किलोमीटरचा हायस्पीड लोहमार्ग असून तो तीन भागांत २०३५ पर्यंत उभा केला जाऊ शकतो, असे या अहवालात नमूद केले आहे. पारंपरिक लोहमार्गाने मुंबई- नागपूर (औरंगाबादमार्गे) गेल्यास बारा तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

हायस्पीड रेल्वेने हे अंतर तीन तास ३४ मिनिटांवर येऊ शकेल. यातील मुंबई- नाशिक टप्पा २०२५, मुंबई- नाशिक- औरंगाबाद टप्पा २०३०, तर मुंबई- नागपूर- औरंगाबाद- नागपूर मार्ग २०३५ पर्यंत पूर्ण केला जाऊ शकेल. २०५० पर्यंत डायमंड क्वॉडीलॅटरलचा मुंबई- कोलकाता हा एक टप्पा पूर्ण होऊ शकणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.

तीन मार्गांच्या शक्‍यता तपासल्या
मागणीचा आधार घेऊन सुरवातीला दहा आणि नंतर त्यातील तीन मार्गांच्या पर्यायांवर खोलवर अभ्यास करण्यात आला. या तीन पर्यायांवर उभारणी, चालविण्याचा खर्च, प्रवासाची वेळ या निकषांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातील सर्वोत्तम मार्ग (अल्टर्नेटिव्ह २) हा मुंबई बीकेसी- ठाणे- नाशिक- औरंगाबाद- अकोला- बडनेरा, अमरावती- नागपूर असा निवडण्यात आला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठीचा खर्च मात्र गुलदस्तात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com