'२६/११ बॉम्बस्फोट ते सिंचन घोटाळा'; जाणून घ्या परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांची मालिका

parambir-singh
parambir-singh

परमबीर सिंग हे मुंबई पोलिसांमधील एक महत्वाचं नाव. मनसुख हिरेन प्रकरणात दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन त्यांना तडकाफडकी हटवण्यात आलं. त्यानंतर नाराज असलेल्या परमबीर सिंग यांनी एका लेटरबॉम्बद्वारे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या पत्रातून त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांना पदावरुन हटवण्यात आल्याने आरोप केल्याचं म्हटलं. पण परमबीर सिंग हे यापूर्वीही अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही झाले आहेत. या आरोपांची मालिका काय आहे जाणून घेवूयात.

सरकारची विश्वासार्हता संपली; आरोप करणारे परमबीर सिंग पहिले नाही

परमबीर सिंग यांच्यावर आरोप झालेली प्रकरणं

  1. अजित पवारांना सिंचन घोटाळाप्रकरणी क्लीनचीट  

    मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे फेब्रुवारी २०१९ मध्ये निवृत्त होणार होते. दरम्यान, २०१८ मध्ये बर्वे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) प्रमुख असताना त्यांनी ७०,००० कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्या नावाचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं होतं. दरम्यान, बर्वे यांच्या जागी एसीबी प्रमुख म्हणून नियुक्तीचा दावा सांगण्यात येत असलेल्यांपैकी एक परमबीर सिंग यांनी अजित पवार यांना या प्रकरणी क्लीनचीट देत कोर्टात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं.
     
  2. सलिल चतुर्वेदीच्या घरात ड्रग्ज ठेवल्याचं प्रकरण 

    प्रोव्होग ड्रग्ज केसमध्ये २ ऑगस्ट २००५ रोजी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी सलील चतुर्वेदी यांच्या अंधेरी येथील घरावर छापा मारला होता. यावेळी त्यांना कोकेनच्या तीन बाटल्या आढळून आल्या होत्या. यानंतर या प्रकरणी चतुर्वेदी यांना अटक झाली होती, त्यानंतर त्यांना एक महिना तुरुंगावसही भोगावा लागला. मात्र, ३ एप्रिल २००९मध्ये पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यावेळी परमबीर सिंग एटीएसचे अतिरिक्त आयुक्त होते. तुरुंगात बाहेर आल्यानंतर सलिल चतुर्वेदीनं दावा केला होता की पोलिसांनी त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला होता. यासाठी पुरावे दाखवण्यासाठी पोलिसांनीच त्याच्या घरात कोकेनच्या बाटल्या ठेवल्या होत्या. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने पुण्यातील सीआयडीला याप्रकरणातील पोलिसांची भूमिका तपासण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये कॉन्स्टेबल अशोक भोसले यांनी आपण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशानुसार हे ड्रग्ज सलिलच्या घरात ठेवल्याचं मान्य केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी घुमजाव केले होते. दरम्यान, सीआयडीनं आरोप केला होता की, परमबीर सिंह यांच्या दबावामुळंच भोसले यांनी आपला जबाब मागे घेतला होता. 
     
  3. २६/११ मुंबई हल्ला प्रकरणी विरोधी याचिका

    २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर आणि महत्वाच्या ठिकाणांवर धडाधड एके ४७ रायफल चालवल्या होत्या. यामध्ये १६० हून अधिक लोकांचा जीव गेला होता तर ३०० हून अधिक लोक जखमी झाले होते. यावेळी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी परमबीर सिंग यांच्यासह इतर तीन अतिरिक्त पोलीस आयुक्तांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. माजी पोलीस आयुक्त हसन गफूर यांच्या एका मुलाखतीच्या आधारावर जुहू येथील एका व्यापाऱ्याने या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी जनहीत याचिका दाखल केली होती.
     
  4. माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी केला 'वाईट पोलीस' असा उल्लेख

    जुलै २०१८ मध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी 'मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी लढणारे दोन पोलीस' या मथळ्याखाली लेख लिहिला होता. या लेखात परमबीर सिंग यांचं नाव न घेता रिबेरो यांनी चांगले पोलीस आणि वाईट पोलीस अशी पोलिसांची प्रतिमा तयार केली होती. यामध्ये परमबीर सिंग यांना वाईट पोलीस दाखवण्यात आलं होतं. ही टिपण्णी म्हणजेच गुन्हा मानत परमबीर सिंग यांनी रिबेरो यांना माफी मागण्यास सांगितलं होतं. इतकंच नव्हे त्यांनी रिबेरो यांच्यावर खटला दाखल करण्याची धमकीही दिली होती. 
     
  5. सलमान खान, समन्स आणि ख्रिसमस पार्टी

    'हिट अँड रन' प्रकरणी ३० नोव्हेंबर २००२ रोजी स्थानिक पोलीस अभिनेता सलमान खान याला समन्स पाठवण्यात अपयशी ठरले होते. त्यांनी सलमान खान मुंबईत नसल्याचा दावा केला होता. मात्र, सलमान खान प्रत्यक्षात वांद्रे येथे एका हायप्रोफाईल ख्रिसमस पार्टीत दिसला होता. तसेच महबूब स्टुडिओत शुटिंग करतानाही तो कॅमेरॅत कैद झाला होता. यानंतर आणखी एक धक्कादायक खुलासा झाला होता की सलमान खानसोबत या पार्टीत आयजीपी परमबीर सिंगही उपस्थित होते.  
     
  6. 'भगवा दहशतवाद'प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना मारहाण

    सध्या भोपाळच्या खासदार असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी परमबीर सिंग यांच्यावर आपल्याला वाईट प्रकारे टॉर्चर केल्याचा आरोप केला होता. कथित भगवा दहशतवाद प्रकरणी मुंबई एटीएसनं जबरदस्तीनं आपल्याला भूमिका मान्य करण्यासाठी छळ केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता.
     
  7. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण

    बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देखील परमबीर सिंह आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतवर लवकर अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तसेच शवविच्छेदन अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झालेल्या बिहार पोलिसांच्या अधिकाऱ्याला क्वारंटाइन करण्यासह बिहार पोलिसांना माहिती न देण्याबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांड्ये यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. 
     
  8. टीआरपी घोटाळा

    टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक मीडियासह इतर दोन वाहिन्यांचा समावेश असल्याचा दावा परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणी अद्याप चौकशी सुरु आहे. याप्रकरणी रिपब्लिक मीडियाने राजकीय परिप्रेक्षातून आपल्यावर आरोप करण्यात आल्याचा दावा केला होता. यासंबंधीच एका प्रकरणाचा सीबीआय देखील तपास करत आहे. 
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com