दाऊदशी संबंधित भाटीबरोबर भोजन | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिक

दाऊदशी संबंधित भाटीबरोबर भोजन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याची चिन्हे नाहीत. माझ्याकडे बरेच बॉम्ब असल्याचे मलिक यांनी बुधवारी पुन्हा सांगितले. अंडरवर्ल्ड संबंधांचा वाद वाढतच चालला असून, दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला रियाझ भाटी हा फडणवीस यांच्यासोबत भोजन कसा करतो, असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.

नोटाबंदीच्या काळात फडणवीस यांच्या पाठिंब्याने बनावट नोटांचे रॅकेट सुरू होते; त्यातून ‘बीकेसी’तील नोटांचे प्रकरण दाबले गेल्याचा आरोपही मलिक यांनी फडणवीस यांच्यावर केला. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी अनेक गुंडांना सत्तेतील पदे दिल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. मलिक आणि फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन बनावट नोटांपासून, पासपोर्ट, बांगलादेशी नागरिकांना मदत, मोठ्या कारवायांमधील ‘सेटलमेंट’ केल्याचे सांगितले.

हेही वाचा: T20 WC : सेमी फायनलमध्ये 2019 वर्ल्ड कप फायनलचा फ्लॅशबॅक! VIDEO

मलिक म्हणाले, ‘‘भाटीकडे दोन पासपोर्ट असूनही फडणवीस यांच्यामुळे त्याला दोन दिवसांत सोडून दिले. त्याला का सोडले, याचा खुलासा फडणवीस यांनी केला पाहिजे. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या कार्यक्रमात तो दिसत होता. तो फडणवीस यांच्यासोबत कसा फिरायचा.बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपीच्या भावाला भाजपत घेऊन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद दिले. या प्रकरणांबाबत गृहखात्याकडे तक्रार करणार आहे,’’ असेही मलिक यांनी सांगितले.

फडणवीस गृहमंत्री असतानाच राजकारणात गुन्हेगारी वाढली. नोटाबंदीच्या काळात बीकेसीत १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या; मात्र ही रक्कम ८ लाख ८० हजार असल्याचे दाखविले गेले. बीकेसीत २०० कोटींचे फ्लॅट कोणाच्या नावावर आहेत. माझ्याविरोधात कुठेही तक्रार करा. मात्र, माझ्याकडील पुराव्यांची चौकशी झाली पाहिजे.

- नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री

loading image
go to top