समृद्धी महामार्गासाठी 70 टक्के जमिनीचे संपादन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई - समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आहे. या महामार्गासाठी भूमी संपादन करताना शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे 70 टक्के जमिनी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

मुंबई - समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग आहे. या महामार्गासाठी भूमी संपादन करताना शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे 70 टक्के जमिनी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे बोलत होते. त्यांनी पुढे माहिती दिली, की समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या भूसंपादन अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भूमी संपादन समित्यांच्या माध्यमातून जमीन अधिग्रहण करण्यात आले. महामार्ग 14 जिल्ह्यातून थेट जात असून, अप्रत्यक्षपणे 10 जिल्ह्यांसह एकूण 24 जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे. हा महामार्ग ग्रीनफिल्ड असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या नागपूर- सिन्नर- घोटी या महामार्गाचे रुंदीकरण करून करता येणे शक्‍य नाही, असेही त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, की महानगरपालिका क्षेत्र, मुंबई महानगर प्रदेश हद्द, तसेच सिडकोच्या क्षेत्रात जमीन अधिग्रहणासाठी टप्पा पद्धतीने दर दिले जात आहेत. हे दर मुळातच अधिक असल्याने जमीन अधिग्रहणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी शासनाने घेतली आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाचे काम लवकराच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी त्या त्या भागात गेल्या तीन वर्षांत झालेल्या जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारातील उच्चतम व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहारांच्या 5 पट अधिक मोबदला देण्याचा निर्णय घेतला.
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री

Web Title: mumbai maaharashtra news samruddhi highway land