आघाडीच्या दिशेने वाटचाल!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची आघाडी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार पायउतार करायचे असल्यास समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, याची जाणिव झाल्यानेच ही हालचाल सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांची आघाडी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार पायउतार करायचे असल्यास समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, याची जाणिव झाल्यानेच ही हालचाल सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. 2014 मध्ये भाजपने प्रचाराचे आक्रमक तंत्र वापरत तसेच नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करीत बहुमताने केंद्रात सत्ता प्राप्त केली. त्यानंतर मागील चार वर्षांत झालेल्या बहुतांश विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपने विजय मिळवले. मात्र नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांमुळे मोदी सरकारच्या विरोधात जाणारे जनमत अलिकडे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे 2019 मध्ये भाजपाला केंद्रातून पायउतार करावयाचे असल्यास ठिकठिकाणी समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी भावना कॉंग्रेसची झाली आहे.

त्यामुळे दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबतचा ठराव संमत केला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अशीच भावना बोलून दाखवली आहे. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल आघाडीच्या दिशेने सुरू झाली असून दोन्ही पक्षांच्या वतीने जिल्हावार संदेश पाठवले जात आहेत. यामध्ये सध्या दोन्ही पक्षांचे जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थात किती लोकप्रतिनिधी आहेत, मागील तीन वर्षांत झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे किती लोकप्रतिनिधी निवडून आले, त्यांचे बलाबल किती याची उजळणी दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडून सध्या सुरू आहे. ठाणे आणि पालघरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने नुकत्याच घेतलेल्या पक्षाच्या मेळाव्यांमध्ये आघाडीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली.

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भाषा केली असून माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. आघाडीच्या दिशेने दोन्ही पक्ष विचार करीत आहेत.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: mumbai maharashtra news aghadi ncp congress politics