पीकविमा योजनेच्या मुदतवाढीसाठी विखे आग्रही

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

मुंबई - पीकविमा योजनेच्या मुदतवाढीसाठी केंद्राशी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सांगितली. योजनेसाठी पैसे भरण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख असली तरी तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींमुळे अद्याप लाखो शेतकरी रांगेत उभे असून, राज्य सरकारने तातडीने केंद्राशी बोलून या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सोमवारी केली.

कामकाज सुरू झाल्यावर आज सकाळी विरोधकांनी यबाबत सरकारला धारेवर धरले होते. विरोधी पक्षांनी याबाबत आज स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. या संदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, पीकविमा योजनेकरिता ऑनलाइन अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. कधी सर्व्हर डाउन; तर कधी इंटरनेट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर दोन-दोन दिवस कामे सोडून रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. यातून निर्माण झालेल्या तणावामुळे राज्यात दोन शेतकऱ्यांचा रांगेत उभे असताना मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

या मागणीसंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. मुदतवाढ न मिळाल्यास तातडीने केंद्र सरकारकडे जाऊन या संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ही मुदतवाढ 15 ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी 10 ऑगस्टपर्यंत होती.

Web Title: mumbai maharashtra news agriculture insurance time increase