पर्यावरण संवर्धनाचे मोठे आव्हान - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पर्यावरणमंत्री रामदास कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.

मुंबई - जल, जमीन आणि जंगल वाचविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पर्यावरणमंत्री रामदास कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'एकीकडे आपण विकास करतोय; पण त्याबरोबर पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. आपल्या पूर्वजांनी जल, जमीन आणि जंगलाला ईश्वराचा दर्जा दिला आहे. या तिन्ही गोष्टी नष्ट झाल्यास कुणीही जगू शकणार नाही. जगाला एका सूत्रात बांधून एकात्मता टिकविणे हा सृष्टी नियमाचा भाग आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पाण्याचे नैसर्गिक स्रोत नष्ट करून आपण पाणलोटचे नुकसान केले. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणून शासनाने जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. उद्योगांनीही पर्यावरणपूरक उद्योग सुरू केले पाहिजेत.''

या वेळी पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या विविध संघटना आणि संस्थांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रेमंड युको डेनिम प्रा. लि. (लोहार, जि. यवतमाळ) हे "वसुंधरा पुरस्कार 2017'चे मानकरी ठरले. गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड (नवी मुंबई) आणि जॉन डिअर इंडिया प्रा. लि. (पुणे) यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

उत्कृष्ट दर्जाचे इसी पोर्टल विकसित केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहायक यंत्रणा अधिकारी दिनेश सोनावणे, वेबवर्क्‍स इंडिया प्रा. लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थावक तुषार चोपडे, वेबवर्क्‍स इंडिया प्रा. लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी सयान पाल यांना पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वनराई, पुणे आणि जलसंवर्धन पंचायतअंतर्गत नाशिक येथील मुळेगाव, जालना येथील बाजार वाहेगाव, रायगड येथील दांडगुरी या गावांचा गौरव करण्यात आला.

Web Title: mumbai maharashtra news The big challenge of environmental conservation