'समृद्धी'च्या अर्थसाह्यासाठी मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग; तसेच राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांना अर्थसाह्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळ मंगळवारपासून (ता. 26) परदेश दौऱ्यावर निघाले आहे. 26 ते 29 सप्टेंबरदरम्यान दक्षिण कोरिया आणि सिंगापूर दौऱ्यात काही सामंजस्य करार केले जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला कर्ज मिळावे, यासाठी कोरियातील कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. महामार्गासाठी कोरिया लॅण्ड ऍण्ड हाउसिंग कार्पोरेशनसोबत सामंजस्य करार अपेक्षित आहे. पुणे आणि कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प; तसेच वांद्रे येथील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत करार होण्याची शक्‍यता आहे.

या दौऱ्यात फडणवीस सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट घेतील. इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीजच्या विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधतील. पुणे विमानतळाच्या आधुनिकीकरणाबाबत चांगी विमानतळ प्राधिकरणासोबत करार करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दौऱ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी सहभागी होतील.

Web Title: mumbai maharashtra news chief minister on foreign tour for samruddhi finance