esakal | रेल्वे, रस्ते, मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे, रस्ते, मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

रेल्वे, रस्ते, मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील रेल्वे, रस्ते, मेट्रो अशा विविध प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर सलग चार तास बैठक घेऊन प्रकल्पांना चालना दिली.

मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील "वॉर रूम'मध्ये आज या प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. या वेळी रेल्वे, जलसंधारण, समृद्धी मार्ग, महामेट्रो आदींच्या कामांबाबत सविस्तर आढावा त्यांनी घेतला. भूसंपादन, सर्वेक्षण, त्याअनुषंगिक असणाऱ्या समस्या समजावून घेऊन संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी लगेचच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून प्रश्नांचे निराकरणही केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या उन्नत मार्गावर खारघर येथे रेल कार शेड निर्माण करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी निश्‍चित केले.

बैठकीतील निर्णय
- 2011च्या जनगणनेच्या आधारे लोहमार्गालगत झोपडपट्टी पुनर्वसनाकरिता सर्वेक्षण पूर्ण करावे.
- सिडको- बेलापूर- सीवूड- उरण मार्गाच्या भूसंपादनासाठी 15 दिवसांत रेल्वेने बैठक घ्यावी.
- मुंबई सेंट्रल आणि बोरिवली दरम्यान होणाऱ्या सहापदरी लोहमार्गाबाबत भूसंपादनाचे काम लवकर मार्गी लावावे.
- पुणे मेट्रोअंतर्गत सहा महिन्यांत स्वारगेट, पुणे येथील एकत्रित परिवहन हब मार्गी लावावा.
- यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला प्रकल्पासाठी 150 कोटी आणि लघु वर्धा प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पुनर्वसनाच्या कामांना वेग द्यावा.

वांग मराठवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसनाबाबतही त्यांनी या वेळी चर्चा केली. गोरेगाव- मुलुंड जोडमार्ग प्रकल्प, कोस्टल मार्ग (दक्षिण), पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, हायब्रीड ऍन्युटी मॉडेल आदींबाबतही त्यांनी या वेळी आढावा घेतला. या बैठकीस मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते.

loading image