सांगली जिल्ह्यातील नेर्लेत बारा बलुतेदारांची टिंगलटवाळी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 जून 2017

पुरुषांना स्त्रिया बनवून लग्न लावण्याची परंपरा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुरुषांना स्त्रिया बनवून लग्न लावण्याची परंपरा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई - स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कार्याची परंपरा सांगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील नेर्ले गावात यात्रेच्या दिवशी बारा बलुतेदारांची चक्‍क टिंगलटवाळी केली जाते. बारा बलुतेदारांतील पुरुषांना स्त्रियांचा वेष परिधान करून त्यांची लग्ने लावली जातात आणि गावातून त्यांची मिरवणूक अर्थात धिंड काढली जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील यांच्यापासून राजाराम बापू पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दबदबा निर्माण केला. त्याच जिल्ह्यात वर्षानुवर्षे ही अनिष्ट परंपरा सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाळावा तालुक्‍यातील नेर्ले या गावात ही परंपरा सुरू आहे. गावातील मोहन नांगरे पाटील या प्रतिष्ठित घराण्यात हा प्रकार घडतो. यात्रेच्या दरम्यान होणाऱ्या या प्रकाराला "जोगण्या भावळी उत्सव' या नावाने संबोधण्यात येते.

यात्रेच्या दिवशी "जोगा' म्हणजे वर पुरुष आणि "जोगी' म्हणजे वधू पुरुष यांची निवड नांगरे पाटील यांच्या घरात केली जाते. जोगामध्ये नाभिक, सुतार आणि कुंभार समाजातील पुरुष; तर जोगीसाठी गुरव, चर्मकार आणि परीट समाजातील पुरुषांची निवड केली जाते. गुरव, चर्मकार आणि पुरीट पुरुषांना स्त्रियांचा वेष परिधान केला जातो. त्यांची लग्ने लावली जातात आणि संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. या वेळी ग्रामस्थ आणि तरुणांकडून त्यांची यथेच्च टिंगलटवाळी केली जाते.
बारा बलुतेदारांनी ही परंपरा कायम जोपासण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. तसे न केल्यास गावावर अरिष्ट ओढविण्याची भीती वर्तविण्यात येते. तसेच, प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्‍ती मृत पावत असल्याचे सांगून ही परंपरा जबरदस्तीने कायम ठेवली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या रुढीला सुरवातीला कुणीही विरोध करत नव्हते; मात्र काही वर्षांपूर्वी परीट आणि चर्मकार समाजातील भावांनी साडी नेसण्यास विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. धक्‍कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी चर्मकार समाजातील सेवानिवृत्त शिक्षकावर ही वेळ आल्यानंतर त्यांनी पळ काढला असता त्यांना शोधण्यासाठी गाड्या सोडण्यात आल्या. या वेळी मारहाणीच्या भीतीमुळे शिक्षकाच्या बंधूने निमूटपणे हा अन्याय सहन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

येत्या दोन दिवसांत नेर्लेत बैठक घेणार आहे. अनिष्ट रुढी- परंपरेला कुणी खतपाणी घालत असेल किंवा जबरदस्ती केली जात असेल तर संबंधितांवर कारवाई करणार.
- विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

Web Title: mumbai maharashtra news crime