डी. एस. कुलकर्णींना हंगामी जामीन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

मुंबई - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 22) हंगामी जामीन मंजूर केला.

मुंबई - गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 22) हंगामी जामीन मंजूर केला.

मुंबई-पुण्यासह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांनी "डीएसके' समूहाच्या कायमस्वरूपी ठेवींमध्ये रक्कम गुंतवली आहे. या रकमेचा परतावा न झाल्यामुळे कुलकर्णी पती-पत्नीविरोधात 170 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने कुलकर्णी यांनी पत्नीसह अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात पुन्हा अर्ज केला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश दिला होता. ते न भरल्याने न्यायालयाने त्यांना जामीन नामंजूर केला होता. याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता.19) पैसे जमा करण्याची मुभा दिली होती. ही रक्कम अद्याप जमा न केल्यामुळे कुलकर्णी अडचणीत आले आहेत. त्यांनी गुरुवारी घाईघाईने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे. तोपर्यंत कुलकर्णी यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गुंतवणूकदारांना दोन महिन्यांत दीडशे कोटी रुपये देण्याची हमी त्यांनी दिली होती; मात्र त्यांच्या अनेक मालमत्ता बॅंकांनी सील केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Web Title: mumbai maharashtra news d s kulkarni temperory bell sanction