देशाला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षणसंस्थांचे योगदान महत्त्वाचे -  देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबई - जगातल्या बऱ्याचशा विकसित देशांची अर्थव्यवस्था वार्धक्‍याकडे झुकली आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येमधील 50 टक्के लोकसंख्या ही तरुण आहे. हा आपल्यासाठी सुवर्णकाळ असून, त्यासाठी आपल्याला मनुष्यबळ तयार करावे लागेल. ते तयार करण्याची जबाबदारी गुरुजनांची आणि शाळांची आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षणसंस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्ष शुभारंभानिमित्त शुक्रवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यासंकुलातील कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, संस्थेचे अध्यक्ष अरविंद वैद्य, सतीश नायक आणि अचला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण हे असे क्षेत्र आहे की, त्यामध्ये परिवर्तन केले तर त्याचा मोठा परिणाम दिसून येईल. हे परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षण संस्थांचे योगदान मोठे असणार आहे. आपली अर्थव्यवस्था ही काही वर्षांत जगात पहिली येईल. कारण जगातल्या बऱ्याचशा विकसित देशांची अर्थव्यवस्था वार्धक्‍याकडे झुकली आहे. आपण केवळ डिग्री मिळवणारे शिक्षण दिले, तर आपले मनुष्यबळ नैराश्‍याकडे जाईल. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिकाधिक संस्थांना स्वायत्ता दिली पहिजे. त्यांचे मूल्यांकनही झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शिक्षणात पहिला
महाराष्ट्र 10 वर्षांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत 16 ते 18 व्या क्रमांकावर होता; पण दोन वर्षांत महाराष्ट्र सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. शिक्षकांच्या ताकदीवर महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमाकांवर आला आहे. आता याच शिक्षकांच्या ताकदीवर राज्यातील शिक्षणाला पहिल्या क्रमाकांवर आणण्याचा मानस असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

Web Title: mumbai maharashtra news devendra fadnavis talking